इंडिया खुली  बॉक्सिंग स्पर्धा

माजी युवा विश्वविजेत्या सचिन सिवाचने अर्जेटिनाच्या रेमन निकॅनोर क्विरोगावर धक्कादायक विजयाची नोंद केली. इंडिया खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सोमवारी पहिल्या दिवशी भारताच्या सात खेळाडूंनी विजयी सलामीसह उपांत्यपूर्व फेरी गाठली.

जीबी बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या सिवाचने आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलत लढतीवर वर्चस्व मिळवले. ५२ किलो वजनी गटाच्या पहिल्या फेरीत त्याने रेमनला ५-० असे नामोहरम केले. पुढील फेरीत सिवाचची जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील माजी कांस्यपदक

विजेत्या रॉगन लॅडॉनशी गाठ पडणार आहे.

महिलांच्या ५७ किलो गटात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सोनिया लाथेरने नेपाळच्या चंद्रा काला थापाचा ५-० असा पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली. मनीषा मौनने फिलिपाइन्सच्या नेस्थी पेटेसिओला ४-१ असे हरवले.

६० किलो गटात प्रीती बेनिवालने नेपाळच्या संगीता सुनारला ५-० असे पराभूत केले. ६० किलो गटात स्पर्धात्मक पदार्पण करणाऱ्या शशी चोप्राने भूतानच्या तंडिन चॉडेनवर ५-० असा एकतर्फी विजय मिळवला. ज्युती गुलिया आणि अनामिका यांनी ५१ किलो गटात सहज विजयांसह आगेकूच केली. ज्योतीने फिलिपाइन्सच्या अर्डिटे मॅग्नोचा ४-१ असा पाडाव केला, तर अनिकामिकाने फिलिपाइन्सच्या क्लाऊडिने डेकेना व्हेलोसाचा पराभव केला.

मागील लढतीत माझा निसटता पराभव झाला होता. मात्र या वेळी मी माझ्या कौशल्यात आणि वेगात सुधारणा करीत खेळ केला. त्यामुळेच अनुकूल निकाल लागला. उपांत्य फेरीतसुद्धा कामगिरीत सातत्य राखण्यासाठी मी उत्सुक आहे.

– सचिन सिवाच, भारतीय बॉक्सर