News Flash

डेव्हिस चषक लढतीत भारताचे पारडे जड!

पाकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीविषयी आणि भारताच्या एकूण कामगिरीविषयी बाळ यांच्याशी केलेली खास बातचीत-

(संग्रहित छायाचित्र)

नंदन बाळ, भारताचे माजी प्रशिक्षक

प्रशांत केणी

डेव्हिस चषक लढतीत पाकिस्तानचा संघ फारसा तयारीने उतरलेला नाही. या संघातील दोन खेळाडू १७ वर्षांचे आहेत. ऐसाम-उल-हक कुरेशी आणि अकिल खान यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंनी सामना इस्लामाबादहून हलवण्यात आल्याचा निषेध म्हणून या लढतीत खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारताचे पारडे जड आहे, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक नंदन बाळ यांनी व्यक्त केले आहे. कझाकस्तानमधील नूर-सुलतान येथे होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीविषयी आणि भारताच्या एकूण कामगिरीविषयी बाळ यांच्याशी केलेली खास बातचीत-

*  पाकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीविषयी तुम्ही काय सांगाल?

भारत-पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस चषक लढत कुठे व्हावी, याविषयी बराच वाद सुरू होता. अखेर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने निर्णय घेत नूर-सुलतान येथे सामना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंची भूमिका यापुढे महत्त्वाची नसते. महासंघाने ठरवले असते हा सामना इस्लामाबादला होणार तर आपल्याला तिथे जावेच लागले असते. भारताचे अव्वल दोन एकेरी टेनिसपटू हे जागतिक क्रमवारीत १०० ते १५० क्रमांकांदरम्यान आहेत, तर पाकिस्तानचा अव्वल टेनिसपटू अकील क्रमवारीत १२००च्या पुढील स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना हिरवळीवर झाला असता किंवा कुरेशी खेळला असता तरच थोडीफार रंगत सामन्यात दिसून आली असती.

*  त्रयस्थ ठिकाणी म्हणजे कझाकस्तानच्या नूर-सुलतान येथे होणाऱ्या सामन्यात वातावरणाचा प्रभाव किती असेल?

हा सामना पूर्वनियोजित कार्यक्रमपत्रिकेनुसार इस्लामाबादला झाला असता तर पाकिस्तानच्या संघाला थोडा फायदा झाला असता. पण तरीही दोन संघांमधील कामगिरीत इतका फरक आहे की, भारताला पाकिस्तानला हरवणे कठीण गेले नसते. नूर-सुलतानचा सामना पाहायला तेथील किती चाहते येतील, याविषयी साशंका आहे. तेथील चाहत्यांना टेनिस क्रमवारीतील अव्वल खेळाडूंचा सामना पाहायची सवय आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना त्यांच्यासाठी फारसा लक्षवेधी नसेल.

*  लिएण्डर पेसचे दुहेरीतील पुनरागमन आणि त्याला विशेषज्ञ जीवन नेदुनशेझियानची साथ हे भारतासाठी किती महत्त्वाचे ठरेल?

पाकिस्तानकडे दुहेरीत आव्हान निर्माण करू शकेल, असे खेळाडू नाहीत. त्यामुळे पेस आणि जीवन जोडी उत्तम दुहेरीचा सामना जिंकू शकेल. त्यामुळे पेसकडून विक्रमाची नोंद करू शकते. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीआधी काही खेळाडूंनी वैयक्तिक कारणास्तव किंवा दुखापतीमुळे माघार घेतल्याने पेसला संधी मिळाली आहे. आधी रोहन बोपण्णा खेळणार हे निश्चित होते.

*  प्रज्ञेश गुणेश्वरन, दिविज शरण आणि बोपण्णा यांच्यासारखे महत्त्वाचे खेळाडू नसल्याची उणीव भारताला जाणवेल का?

अजिबात नाही. कारण रामकुमार रामनाथन, सुमित नागल, पेस, जीवन हे नामांकित खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. शशी मुकुंद हा राखीव खेळाडूच होता.

*  भारताच्या सध्याच्या टेनिसमधील पिढीचे तुम्ही कसे विश्लेषण कराल?

सुमीत, रामकुमार, प्रज्ञेश एकेरीत आणि दिविज दुहेरीत अतिशय मेहनतीने कामगिरी उंचावत आहेत. सोमदेव देववर्मनच्या निवृत्तीनंतर काही वर्षांनी दुखापती आणि अन्य आव्हाने पेलत हे खेळाडू उत्तम खेळ करीत आहेत. ५२ आठवडय़ांपैकी ४० आठवडे कोर्टवर व्यावसायिक टेनिस खेळणे, हे सोपे नसते. सुमीतला आपली खेळण्याची शैली जपण्यासाठी चांगली तंदुरुस्ती राखावी लागते.

* गेल्या काही वर्षांमधील डेव्हिस चषक स्पर्धामधील भारताच्या कामगिरीविषयी तुम्ही काय सांगाल?

डेव्हिस चषक स्पर्धेच्या जागतिक गटात खेळण्यासाठी जागतिक क्रमवारीत अव्वल १००पैकी स्थान असलेले दोन खेळाडू एक दुहेरीतील जोडी लागते. जोपर्यंत हे साध्य होत नाही, तोपर्यंत आशियाई स्तराच्या अंतिम टप्प्यापर्यंत किंवा जागतिक गटाच्या पात्रता टप्प्यापर्यंत पोहोचलो तरी उत्तम कामगिरी म्हणता येईल. भारताकडे एक एकेरीतील खेळाडू आणि दुहेरीतील जोडी उत्तम आहे. जागतिक गटाच्या पात्रतेच्या अंतिम टप्प्याकडे जरी नजर टाकली तरी इथपर्यंत पोहोचलेल्या संघांकडे अव्वल १०० क्रमांकावरील दोन-तीन खेळाडू असतात. त्यामुळे सर्बिया, स्पेनसारख्या खेळाडूंचा सामना करणे भारतासाठी आव्हानात्मक ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 1:28 am

Web Title: indias side is heavy in davis cup abn 97
Next Stories
1 मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : पृथ्वीमुळे मुंबईचा विजय
2 किपचोगे, मुहम्मद जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलेटिक्सपटू
3 ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय
Just Now!
X