News Flash

स्टम्पमागे धोनी सल्ला देण्यासाठी नसल्यामुळे फिरकीपटूंची कामगिरी खालावतेय – किरण मोरे

फिरकीपटू पूर्वीसारखा मारा करत नाहीयेत !

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर सुमारे वर्षभराने धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. १५ ऑगस्टला संध्याकाळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत धोनीने आपण निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. आपल्या काळात यष्टीमागून धोनी गोलंदाजांना मोलाचे सल्ले देण्यामध्ये माहीर होता. अनेकदा धोनी गोलंदाजांना टप्पा कुठे ठेव, लाईन अँड लेन्थ कशी असावी याचं मार्गदर्शन करायचा. ज्यामुळे चहल, कुलदीप यादव, जाडेजा यांसारखे फिरकीपटू चांगली कामगिरी करताना दिसायचे. परंतू आता सल्ले देण्यासाठी धोनी नसल्यामुळे भारतीय फिरकीपटूंची कामगिरी खालावतेय असं मत माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी व्यक्त केलं.

“धोनी आपल्या काळात गोलंदाजांचा सारखे सल्ले द्यायचा…बॉलचा टप्पा कुठे असावा, लाईन कोणती असावी…आणि याचा गोलंदाजांना फायदा झालेलाही आपण पाहिलं आहे. पण आता धोनी संघात नाहीये त्यामुळे फिरकीपटूंची कामगिरी खालावते आहे, ती पूर्वीसारखी होत नाहीये. कुलदीप यादव घ्या किंवा रविंद्र जाडेजा घ्या ते पूर्वीसारखे मारा करत नाहीयेत. ज्यावेळी धोनी संघात होता तेव्हा विराट सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी उभा रहायचा. परंतू धोनी नसल्यामुळे गोलंदाजांना सल्ला देण्यासाठी, त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आता त्यालाही शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर किंवा मिड ऑफला उभं रहावं लागत आहे.” किरण मोरे माजी क्रिकेटपटू डब्ल्यू.व्ही.रमन यांच्या Inside Out या पॉडकास्टमध्ये बोलत होते.

यावेळी बोलत असताना किरण मोरे यांनी धोनीसारखा दुसरा खेळाडू सापडणं सोप नसल्याचं म्हटलं आहे. “तुम्ही पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड या संघांकडे पाहिलंत तर ते देखील आता यष्टीरक्षक-कर्णधार असा ट्रेंड सुरु करत आहेत. कारण यष्टींमागे राहून सामन्याचं पारडं कोणत्या दिशेला झुकतंय याचा अंदाजा घेणारा एक खेळाडू संघात असतं गरजेचं असतं.” आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर धोनी आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळला. परंतू इकडेही त्याला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 9:26 am

Web Title: indias spinners are struggling without ms dhonis advice says kiran more psd 91
Next Stories
1 धोनीकडे युवराज होता, हार्दिकलाही अशाच एका आणखी फिनीशरची गरज – आकाश चोप्रा
2 अजिंक्य रहाणे आक्रमक कर्णधार ! इयन चॅपल यांच्याकडून कौतुक
3 रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा
Just Now!
X