भारताच्या पुरुष हॉकी संघाने ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमध्ये रविवारी दुसऱ्या लढतीत नेदरलँड्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ अशी धूळ चारत दोन गुणांची कमाई केली.

जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारताने क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँड्सला मुख्य सामन्यात ३-३ असे बरोबरीत रोखले. त्यामुळेच नेदरलँड्सला एक गुण मिळाला. भारताने शनिवारी नेदरलँड्सवर ५-२ असा धक्कादायक विजय मिळवला होता. त्यामुळे दोन सामन्यांद्वारे भारताने गुणतालिकेत एकूण ५ गुण प्राप्त केले आहेत.

दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या सत्राअखेरीस भारतीय संघ १-३ असा पिछाडीवर पडला होता. परंतु  मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने चौथ्या सत्रात दिमाखदार पुनरागमन करीत बरोबरी साधली. मनदीप सिंग (५१व्या मिनिटाला) आणि रुपिंदर सिंग (५५व्या मि.) यांनी हे महत्त्वाचे गोल साकारले. त्याआधी २५व्या मिनिटाला ललित उपाध्यायने भारताचे खाते उघडले. वीरर्डेन व्हॅन डर मिंक (२४व्या मि.), जेरॉन हर्ट्झबर्गर (२६व्या मि.) आणि बोर्न कीलीरमॅन (२७व्या मि.) यांनी दुसऱ्या सत्रात साकारलेल्या गोलमुळे नेदरलँड्सने मध्यांतराला आघाडी मिळवली होती. त्यामुळे नेदरलँड्स हा सामना आरामात जिंकण्याची चिन्हे होती, परंतु सामन्याच्या अखेरच्या १० मिनिटांत भारताने बरोबरी साधली.