करोनामुळे जवळपास तीन महिने जगभरातील क्रिकेट बंद असले तरी लवकरच भारतीय संघाला पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहण्याची संधी सर्व क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका दौऱ्याला हिरवा कंदील दाखवला असून ऑगस्टमध्ये उभय संघांत मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका रंगणार असल्याचे समजते.

मात्र याविषयी ‘बीसीसीआय’चे अधिकृत संकेतस्थळ तसेच ट्विटर खात्यावर काहीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. परंतु श्रीलंकन क्रिकेट मंडळाने मालिकेच्या आयोजनाच्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली असून ही मालिका किमान ३० ते ४० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे श्रीलंकन मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. त्याचप्रमाणे संपूर्ण मालिका एकाच स्टेडियमवर खेळवण्याचा विचारही सुरू आहे.

मार्च महिन्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारी एकदिवसीय मालिका करोनामुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर भारतासह जगभरातील क्रीडा विश्व ठप्प पडले. मात्र श्रीलंका दौऱ्याच्या निमित्ताने भारताच्या क्रिकेट सामन्यांना पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता बळावली आहे. या दौऱ्यापूर्वी श्रीलंकेमध्ये स्थानिक क्रिकेट सामन्यांना प्रारंभ करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळ प्रयत्नशील आहे.

भारत-श्रीलंका यांच्यात जूनमध्येच प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ती ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. आता या मालिकेद्वारे श्रीलंकन मंडळ जवळपास १५० ते २०० कोटींची नुकसानभरपाई करणार आहे.

आशिया चषक ‘युएई’ऐवजी श्रीलंकेत

कोलंबो : आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) बुधवारी आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा श्रीलंकेमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. श्रीलंकन क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शामी सिल्व्हा यांनी याविषयी अधिकृत घोषणा केली. मंगळवारीच ‘एसीसी’ने आशिया चषकाचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्यात आल्याचे जाहीर केले होते. परंतु बुधवारी सकाळी झालेल्या बैठकीत त्यांनी याविषयी अंतिम निर्णय घेतला. सप्टेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे पाकिस्तानतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार होते. परंतु पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी सध्या ते शक्य नसल्याचे सांगितल्याने आता २०२२ मध्ये पाकिस्तान आशिया चषकाचे आयोजन करेल.

भारत, आफ्रिका, इंग्लंडमध्ये तिरंगी स्पर्धेची शक्यता

लंडन : इंग्लंड आणि वेल्य क्रिकेट मंडळ (ईसीबी) भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांशी लवकरच तिरंगी स्पर्धा खेळवण्याचा विचारात आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर भारतीय महिला संघ क्रिकेटपासून दूर असून त्यांची इंग्लंडविरुद्ध जूनमध्ये होणारी द्विराष्ट्रीय मालिकाही रद्द करण्यात आली आहे. मात्र जुलै महिन्यात या तीन संघांत तिरंगी स्पर्धा खेळवण्यासाठी ‘ईसीबी’ प्रयत्नशील असून त्या दृष्टीने दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांशी त्यांची चर्चा सुरू आहे.