करोनामुळे सध्या संपूर्ण क्रीडा विश्व ठप्प पडले आहे. परंतु हे संकट दूर झाल्यानंतर झालेल्या आर्थिक नुकसानाची अधिकाधिक भरपाई करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अनोखी युक्ती वापरणार असल्याचे दिसते. त्यानुसार एकाच दिवशी भारताचे दोन आंतरराष्ट्रीय सामने (कसोटी आणि ट्वेन्टी-२०) खेळवता येऊ शकतात, असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्या दोन महिन्यांपासून भारतातील आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील क्रिकेट स्पर्धाही बंद आहेत. मात्र येत्या काळात जर सर्व काही लवकरच सुरळीत झाले, तर क्रिकेटच्या स्पर्धाचे एकामागोमाग एक आयोजन करून नफा मिळवण्यासाठी ‘बीसीसीआय’ प्रयत्नशील आहे. ‘‘क्रीडा स्पर्धा मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना कधी सुरुवात होईल, हे आपल्यापैकी कोणीही सांगू शकत नाही. परंतु प्रेक्षकांपासून प्रायोजकांसोबतचे संबंध जपून ठेवणे आमची जबाबदारी आहे. त्यामुळे क्रिकेट सामन्यांना सुरुवात होईपर्यंत वाट पाहण्याऐवजी आम्ही आतापासूनच आर्थिक नुकसानाची कशा प्रकारे भरपाई करता येईल, यावर विचारविनिमय करत आहोत,’’ असे ‘बीसीसीआय’चा अधिकारी म्हणाला.

‘‘एकाच दिवशी भारताचे दोन विविध खेळाडूंचे संघ मैदानावर उतरवून दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्याचा विचार सध्या ‘बीसीसीआय’ करत आहे. उदाहरणार्थ जर विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांसारखे अनुभवी खेळाडू कसोटी सामना खेळत असतील, तर त्याच दिवशी सायंकाळी श्रेयस अय्यर, नवदीप सैनी यांसारख्या युवा खेळाडूंचा समावेश असलेला भारताचा दुसरा संघ एखादा ट्वेन्टी-२० सामना खेळू शकतो. या प्रकारे चाहत्यांचेही मनोरंजन होईल व प्रायोजक, क्रीडा वाहिन्यांसह ‘बीसीसीआय’लासुद्धा आर्थिक लाभ होईल,’’ असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

यापूर्वी २०१७मध्ये ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे श्रीलंका आणि भारताविरुद्ध झालेल्या लागोपाठच्या दोन सामन्यांसाठी दोन संघ मैदानावर उतरवले होते. २२ फेब्रुवारी रोजी अ‍ॅडलेड येथे ऑस्ट्रेलियाचा एक संघ श्रीलंकेविरुद्ध ट्वेन्टी-२० सामना खेळला, तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पुणे येथे झालेल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली होती.

फिंचचा ‘बीसीसीआय’च्या संकल्पनेला पाठिंबा

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने ‘बीसीसीआय’च्या एकाच दिवशी दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्याच्या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. ‘‘निश्चितच या पर्यायाचा अवलंब करण्यास काहीच हरकत नाही. फक्त यामुळे जे खेळाडू तिन्ही प्रकारांत खेळतात, त्यांना कोणत्या तरी एखाद्या प्रकाराच्या सामन्याला मुकावे लागेल. परंतु यामुळे अनेक युवा खेळाडू किंवा असे खेळाडू ज्यांना सातत्याने चांगली कामगिरी करूनही नाइलाजास्तव अंतिम संघात स्थान मिळत नाही, ते किमान एखादा प्रकार खेळू शकतील. म्हणूनच भविष्यात ऑस्ट्रेलिया एकाच दिवशी विविध खेळाडूंसह दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी नक्कीच सज्ज आहे,’’ असे फिंच म्हणाला.