करोना विषाणूच्या लसीचा पहिला डोस घेतलेल्या भारतीय संघातील क्रिकेटपटूंमध्ये आता ऋषभ पंतच्या नावाचाही समावेश झाला आहे. पंतने आपल्या ट्विटर हँडलवर डोस घेतानाचा फोटो शेअर केला आहे.

”मी माझा पहिला डोस घेतला. जेव्हा तुम्ही पात्र असाल, तेव्हा बाहेर जाऊन लस घ्या. जितक्या लवकर आपल्याला लस मिळेल तितक्या लवकर आपण या विषाणूचा पराभव करू शकू”, असे पंतने आपल्या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये म्हटले.

 

भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. तिथे ते न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळतील. हा सामना साऊथम्प्टन येथे खेळला जाईल. ऋषभ पंतचा भारतीय संघात समावेश असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर तो संघाचा अविभाज्य भाग झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत फलंदाजीसह त्याचा फॉर्म अधिक चांगला झाला आहे. इंग्लंड दौर्‍यावर त्याच्याकडून उत्तम कामगिरीची चाहत्यांना नक्कीच अपेक्षा असेल.

ऋषभ पंतशिवाय भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही या लसीचा पहिला डोस घेतला. या दोघांव्यतिरिक्त शिखर धवन, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव यांनीही ही लस घेतली असून लोकांना लस घेण्यासंदर्भात आवाहन केले आहे.

आयपीएल दरम्यान काही खेळाडूंना करोनाची लागण झाली. त्यानंतर ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. आता स्पर्धेचे उर्वरित सामने नव्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्याचे आव्हान बीसीसीआयसमोर आहे.