भारताच्या पुरुष आणि महिला संघाला चौथ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पाचव्या फेरीत मात्र त्यांनी दमदार मुसंडी मारत विजयाची नोंद केली. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने ४१व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये अनुक्रमे माँटेनेग्रो आणि ऑस्ट्रिया संघावर मात केली.
पुरुषांमध्ये परिमार्जन नेगी, एस. पी. सेतूरामन आणि कृष्णन शशीकिरण यांनी विजय नोंदवले तर बी. अधिबान याला दुबळ्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना नेगीने निकोला जुकिक याचा सहज पराभव केला. सेतूरामनने ड्रॅगिसा ब्लागोजेव्हिकला हरवत भारताची गुणसंख्या वाढवली. त्यानंतर शशीकिरणने मिलान ड्रास्को याचा पराभव करत भारताच्या विजयावर मोहोर उमटवली. मात्र भारताला निर्भेळ यश मिळवून देण्यात अधिबानला यश मिळाले नाही. ड्रॅगन कोसिकविरुद्ध सुरुवातीला तो चाचपडत होता, पण नंतर त्याने बरोबरी पत्करण्यात धन्यता मानली. तानिया सचदेवच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने चारही पटांवर विजय मिळवत ४-० असा दमदार विजय मिळवला. द्रोणावल्ली हरिकाने वेरोनिका एक्सलर हिला हरवल्यानंतर ईशा करवडेने कॅथरिना नेवर्कला हिला पराभूत केले. मेरी अ‍ॅम गोम्सने ज्युलिया नोवकोव्हिक हिला पराभूत करत फॉर्मात आल्याचे दाखवून दिले. पद्मिनी राऊतने एलिझाबेथ हपाला हिला नमवले.
सहा फेऱ्यांनंतर भारतीय पुरुष संयुक्तपणे २५व्या स्थानावर असून आणखी एका विजयानंतर भारतीय संघ पहिल्या दहा जणांमध्ये स्थान मिळवू शकेल. भारतीय महिलांनी या विजयासह १९व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.