पाटा खेळपट्टीवर जिथे इंग्लंडने ३२५ धावांचा डोंगर फक्त ४ बळी गमावून उभारला तिथे भारताच्या खेळाडूंना आव्हानांचा पाठलाग करताना फेस आला आणि हा फेस आणला तो फिरकीपटू जेम्स ट्रेडवेलने. भारतासाठी विजयाची आशा ठरतील अशा चारही फलंदाजांना ट्रेडवेलने तंबूचा रस्ता दाखवत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इयान बेल आणि अॅलिस्टर कुक यांच्या दमदार सलामीच्या जोरावर इंग्लंडने ३२५ धावांची मजल मारली. अवसानघातकी फलंदाजीमुळे भारताला ३१६ धावाच करता आल्या आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यात ९ धावांनी पराभवाची नामुष्की ओढवली. या विजयासह इंग्लंडने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. चार महत्त्वाचे बळी मिळवणाऱ्या ट्रेडवेलला या वेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
३२६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या गंभीर-रहाणे या नव्या जोडीने ९६ धावांची खणखणीत सलामी दिली. ट्रेडवेलला मोठा फटका खेळण्याचा नादात रहाणे डर्नबॅचकडे झेल देऊन बाद झाला. यानंतर गंभीरने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र मोठी खेळी करण्याचे त्याचे प्रयत्न ट्रेडवेलने संपुष्टात आणले. त्याने ५२ धावा केल्या. टीम ब्रेसननने कोहलीला १५ धावांवर बाद करत भारतीय संघाला अडचणीत टाकले. यानंतर युवराज सिंगने सुरेश रैनाच्या साथीने डाव सावरला. डर्नबॅचच्या एका षटकात तीन चौकार वसूल करत युवराजने धावगतीचे दडपण कमी केले. जो रुटच्या गोलंदाजीवर त्याने लागोपाठ दोन चौकार वसूल केले. या तुफानी फटकेबाजीमुळे प्रेक्षकांमध्येही जल्लोषाची लाट पसरली. यादरम्यान युवराजने आपले अर्धशतक पूर्ण केले. खेळपट्टीवर स्थिरावलेला युवराज सूत्रधाराची भूमिका निभावत संघाला विजय मिळवून देणार असे चित्र होते. मात्र जेम्स ट्रेडवेलने एका फसव्या चेंडूवर त्याला बाद केले. त्याने ८ चौकार आणि एका षटकारासह ६२ धावांची खेळी केली.
युवराज बाद झाल्यावर सुरेश रैनाने सामन्याची सूत्रे हाती घेतली. बॅटिंग पॉवरप्लेदरम्यान आक्रमक खेळ करत धावगतीचे समीकरण आटोक्यात ठेवले. मात्र पुन्हा एकदा ट्रेडवेलने स्थिरावलेल्या फलंदाजाला बाद करण्याची किमया केली. ट्रेडवेलने स्वत:च्याच गोलंदाजीवर त्याचा झेल टिपला. ७ चौकारांच्या साथीने रैनाने ५० धावा केल्या. रैना बाद झाला तेव्हा भारतीय संघाला ५४ चेंडूंत ८३ धावांची आवश्यकता होती. मात्र कर्णधार धोनीने समीत पटेलच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचत दडपण कमी केले. ब्रेसननच्या पुढच्या षटकात आणखी एक षटकार खेचत धोनीने विजयाच्या आशा पल्लवित केल्या. डर्नबॅनला धोनीने जोरदार फटका लगावला पण चेंडू रुटच्या हाती विसावला आणि स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला. धोनी बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांनी लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपुराच ठरला.
तत्पूर्वी इंग्लंडच्या फलंदाजांनी शानदार एकत्रित प्रदर्शनाच्या जोरावर ३२५ धावांचा डोंगर उभारला. कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणाऱ्या अॅलिस्टर कुकने एकदिवसीय प्रकारातही धावांची टांकसाळ उघडली. सराव सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या इयान बेलसह कुकने पहिल्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी केली. या दीडशतकी भागीदारीने इंग्लंडने भारताविरुद्ध भारतात सलामीच्या भागीदारीचा ३० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. शतकाकडे कूच करणारा इयान बेल अजिंक्य रहाणेच्या थेट धावफेकीमुळे तंबूत परतला. त्याने ९ चौकार आणि एका षटकारासह ८५ धावांची खेळी केली. बेलनंतर पीटरसन कुकच्या साथीला आला. मात्र बेलप्रमाणेच कुकचे शतकही पूर्ण होऊ शकले नाही. सुरेश रैनाने त्याला बाद केले. कुकने ११ चौकार आणि एका षटकारासह ७५ धावा केल्या. यानंतर केव्हिन पीटरसन आणि इऑन मॉर्गन यांनी सातच्या सरासरीने दहा षटकांत ७६ धावा फटकावल्या. हे दोघे इंग्लंडला तीनशेचा टप्पा ओलांडून देणार असे वाटत असतानाच दिंडाने पीटरसन आणि मॉर्गनचा अडसर दूर केला. सामन्यात परतण्याची भारतीय संघाला चांगली संधी होती. मात्र क्रेग किस्वेटर आणि समीत पटेल या जोडीने २५ चेंडूंत ७० धावांची लयलूट केली. किस्वेटरने २० चेंडूंत २४ तर पटेलने २० चेंडूत ४४ धावांची आक्रमक खेळी केली.
धावफलक
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक झे. रहाणे गो. रैना ७५, इयान बेल धावचीत रहाणे ८५, केव्हिन पीटरसन झे. कोहली गो. दिंडा ४४, इऑन मॉर्गन झे. व गो. दिंडा ४१, क्रेग किस्वेटर नाबाद २४, समीत पटेल नाबाद ४४. अवांतर १२,  एकूण ५० षटकांत ४ बाद ३२५.
बादक्रम : १-१५८, २-१७२, ३-२४८, ४-२५५.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ७-०-५२-०, इशांत शर्मा १०-२-८६-०, अशोक दिंडा ८-०-५३-२, रविचंद्रन अश्विन ९-०-६१-०, रवींद्र जडेजा १०-०-४६-०, सुरेश रैना ५-०-१८-१, विराट कोहली १-०-९-०
भारत : अजिंक्य रहाणे झे. डर्नबॅक गो. ट्रेडवेल ४७, गौतम गंभीर झे. बेल गो. ट्रेडवेल ५२, विराट कोहली झे. किस्वेटर गो. ब्रेसनन १५, युवराज सिंग झे. डर्नबॅक गो. ट्रेडवेल ६१, सुरेश रैना झे. व गो. ट्रेडवेल ५०, महेंद्रसिंग धोनी झे. रुट गो. डर्नबॅक ३२, रवींद्र जडेजा त्रिफळा गो. डर्नबॅक ७, रविचंद्रन अश्विन झे. किस्वेटर गो. फिन १३, भुवनेश्वर कुमार नाबाद २०, अशोक दिंडा त्रि. गो. ब्रेसनन ३, इशांत शर्मा नाबाद ७. अवांतर ९, एकूण ५० षटकांत ९ बाद ३१६
बादक्रम : १-९६, २-१०२, ३-१३८, ४-१९८, ५-२४३, ६-२७१, ७-२७३, ८-२९७, ९-३०७
गोलंदाजी : स्टीव्हन फिन १०-०-६३-१, जॉन डर्नबॅक १०-०-६९-२, टीम ब्रेसनन ८-०-६७-२, जेम्स ट्रेडवेल १०-०-४४-४, जो रुट ९-०-५१-०, समीत पटेल ३-०-२१-०
सामनावीर : जेम्स ट्रेडवेल
दोन षटके खेळपट्टीवर थांबलो असतो तर.. – धोनी
अखेरच्या दोन षटकांमध्ये आम्ही जास्त धावा दिल्या आणि त्याचाच फटका आम्हाला बसला.आम्हाला फलंदाजीमध्ये चांगली सुरुवात मिळाली, पण त्याचा फायदा आम्हाला उचलता आला नाही. अखेरच्या दहा षटकांमध्ये आमच्या हातात जास्त विकेट्स नसल्याने दडपण वाढत गेले. जर मी जवळपास दोन षटके खेळपट्टीवर थांबलो असतो तर आम्ही हा सामना जिंकू शकलो असतो. अशोक दिंडा अखेरच्या षटकांमध्ये भेदक गोलंदाजी करू शकतो, हे आम्हाला माहिती होते, पण अन्य गोलंदाज कशी गोलंदाजी करतात हे आम्हाला पाहायचे होते. जर आमच्या हातात जास्त विकेट्स असल्या असत्या तर नक्कीच सामन्याचा निकाल वेगळा असता. खेळपट्टीवर गोलंदाजांना जास्त मदत मिळत नव्हती, संघाची फलंदाजी अधिकाधिक चांगली व्हायला हवी, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सामन्यानंतर सांगितले.