‘विजयासाठी वाट्टेल ते’ या उक्तीला जागत ओएनजीसी (दिल्ली) संघाने बेशिस्त वर्तनासह आरसीएफ अखिल भारतीय कबड्डी सुफला चषकावर नाव कोरले. पहिल्याच मिनिटाला ओएनजीसीचा चढाईपटू जसबीर एअर इंडियाच्या साखळीपुढे मैदानाबाहेर फेकला गेला. पंचांनी त्याला बाद दिले. या प्रकाराने भडकलेल्या ओएनजीसीच्या व्यवस्थापकांनी पंचांशी हुज्जत घातली आणि त्यांना धक्काबुक्कीही केली. अखेर आयोजकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. एअर इंडियाने याचा फायदा उठवत लोण चढवून ११-२ अशी आघाडी घेतली. अजय ठाकूरने आपल्या आक्रमणाने ओएनजीसीची दाणादाण उडवली. यानंतर ओएनजीसीने अजयला केंद्रित करत आक्रमण केले आणि मध्यंतराला ११-१६ अशी आघाडी कमी केली. जसबीरने आपल्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर एअर इंडियाचा बचाव भेदला आणि प्रत्येक चढाईला गुण घेण्याचे कामही केले. ओएनजीसीने लोण चढवून २५-२१ अशी मुसंडी मारत विजय मिळवला. उत्तम चढाईपटूचा पुरस्कार तामिळनाडूची योगलक्ष्मी आणि एअर इंडियाच्या अजय ठाकूरला मिळाला. सुवर्णा बारटक्के आणि नीलेश शिंदे उत्तम पकडपटू ठरले. सर्वोत्तम खेळाडूचा किताब ज्योती आणि जसबीर सिंग यांनी पटकावला.