01 March 2021

News Flash

भारत-चीन सामना गोलशून्य बरोबरीत

प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी भारतीय संघात एकमेव बदल करत नारायण दासला संधी दिली होती.

सुनील छेत्री

चीनमधील सुझोऊ सिटी येथील सुझोऊ स्पोर्ट्स सेंटर स्टेडियममध्ये भारत आणि चीन या देशांमध्ये रंगलेला आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. त्यामुळे २१ वर्षांनंतर शेजारील राष्ट्रांमध्ये रंगलेल्या या लढतीवर चीनने वर्चस्व गाजवले तरी भारताच्या बचावपटूंनी दमदार खेळ करत त्यांना गोल करण्यापासून रोखले.

प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी भारतीय संघात एकमेव बदल करत नारायण दासला संधी दिली होती. चीनच्या आघाडीवीरांनी गोल करण्याचे भरपूर प्रयत्न केले, पण कर्णधार संदेश झिंगन, नारायण दास, प्रीतम कोटल आणि सुभाशीष बोस यांच्या अभेद्य बचावापुढे ते निष्प्रभ ठरले. चीनला संपूर्ण सामन्यात गोल करण्याच्या सुवर्णसंधी असताना भारताचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू त्यांच्या वाटेत भक्कम अडसर बनून उभा होता. गुरप्रीतने किमान चार वेळा सुरेख कामगिरी करून प्रतिस्पध्र्याना गोल करण्यापासून रोखले. चीनला घरच्या मैदानावर बरोबरीत रोखत भारताच्या खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी केली.

भारतानेही अनेक वेळा चीनच्या गोलक्षेत्रात मजल मारली, पण प्रीतम कोटल आणि राखीव खेळाडू फारूख चौधरी यांनी गोल करण्यात अपयश आले. सामना बरोबरीत सोडवल्यामुळे भारताच्या ‘फिफा’ क्रमवारीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

२००६च्या विश्वचषक विजेत्या इटली संघाचे प्रशिक्षक मार्सेलो लिप्पी यांना चीनने करारबद्ध केले असले तरी त्यांना गेल्या तीन सामन्यांत एकदाही गोल करण्यात यश आले नाही. चीनला गेल्या महिन्यात अननुभवी कतारकडून ०-१ असे पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर बहारिनने त्यांना गोलशून्य बरोबरीत रोखले होते. चीन आक्रमक खेळ करणार, या अपेक्षेने प्रशिक्षक कॉन्स्टन्टाइन यांनी बचावफळीवर भिस्त ठेवली होती. त्यातच गुरप्रीतने अप्रतिम गोलरक्षण करत यजमानांचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 2:05 am

Web Title: indo china match equals tie up
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाकडून हरयाणा स्टिलर्सचा धुव्वा
2 मनसेकडून पृथ्वी शॉच्या परिवाराला धमक्या, बिहारच्या काँग्रेस खासदाराचा आरोप
3 Pro Kabaddi Season 6 : उत्तर प्रदेशचे योद्धे तेलगू टायटन्सकडून पराभूत
Just Now!
X