टोक्यो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या हॉकी मालिकेची भारतीय महिला संघाने यशस्वी सुरुवात केली. कर्णधार राणी रामपालने नोंदवलेल्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंड विकास संघाचा ४-० असा पाडाव करत दौऱ्यातील पहिला विजय नोंदवला.

राणीचे दोन गोल तसेच शर्मिला आणि नमिता टोप्पो यांनी तिला दिलेली साथ यामुळे भारताला या सामन्यात वर्चस्व गाजवता आले. सुरुवातीला भारतीय संघाला चेंडूवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या. पहिल्या दोन सत्रांत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नसला तरी तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला राणी रामपालने पहिला गोल नोंदवून भारताचे खाते खोलले.

आघाडी घेतल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करत लागोपाठ पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. अखेर शर्मिलाने भारताची आघाडी २-० अशी वाढवल्यानंतर राणीने चौथ्या सत्राच्या सुरुवातीला आपला दुसरा गोल लगावला. अखेरच्या क्षणी नमिता टोप्पोने गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध चार तर ग्रेट ब्रिटनविरुद्ध एक सामना खेळणार आहे.