खेळांमुळे मने जोडली जातात, असे म्हटले जाते. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रीडाविषयक संबंधही दुरावले होते. मात्र लवकरच या सख्ख्या शेजाऱ्यांमध्ये क्रिकेट आणि हॉकी मालिकेच्या निमित्ताने क्रीडासेतू बांधला जाण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.  
पाकिस्तानशी तटस्थ ठिकाणी खेळण्याचा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) विचाराधीन आहे. २००७-०८नंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळलेली नाही. मात्र भारतातील विविध ठिकाणी दोन देशांदरम्यान एकदिवसीय सामने झाले आहेत. व्यावसायिक यशाच्या दृष्टीने पाकिस्तानविरुद्ध तटस्थ ठिकाणी मालिका खेळवण्याबाबत बीसीसीआयच्या तातडीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली.
दुबई, अबू धाबी किंवा शारजा या ठिकाणी ही मालिका होऊ शकते. यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, मात्र ही मालिका होण्याची शक्यता असल्याचे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, हॉकी इंडियाने स्वारस्य दाखवल्यामुळे बहुचर्चित भारत-पाक हॉकी मालिका मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. तीन सामन्यांच्या हॉकी मालिकेसाठी भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर रवाना होऊ शकतो. पाकिस्तान हॉकी महासंघाचे सचिव राणा मुजाहिद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कराची, लाहोर आणि फैसलाबाद या ठिकाणी हे सामने होऊ शकतात. मात्र या मालिकेसाठी भारत सरकारकडून हिरवा कंदील मिळणे आवश्यक आहे. सरकारच्या परवानगीशिवाय काहीही अपेक्षा करणे चुकीचे आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.