भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका खेळवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये जोरदार वारे वाहू लागले आहे. ही मालिका संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात यावी, असा अट्टहास पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) शहरयार खान यांनी धरला होता. पण त्यांनी हा अट्टहास सोडला असून ही मालिका कोणत्या ठिकाणी खेळवावी, यासाठी आम्ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर (बीसीसीआय) चर्चा करण्यासाठी तयार आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
काही दिवसांपूर्वी खान यासंदर्भात भारत भेटीवर आले होते. या वेळी त्यांनी अर्थ आणि माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा केली होती, त्याचबरोबर त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचीही भेट घेतली होती. त्या वेळी दालमिया यांनी ही मालिका भारतामध्ये खेळवावी, असे दालमिया यांनी म्हटले होते. त्या वेळी ही मालिका अमिरातीमध्ये खेळवण्याचा अट्टहास खान यांनी धरला होता. पण अखेर त्यांचा हा अट्टहास मावळला असून ते या मालिकेच्या ठिकाणाबाबत चर्चा करायला तयार आहेत.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अजूनही याबाबत कोणतेही लिखित केलेले नाही. पाकिस्तानला ही मालिका अमिरातीमध्ये खेळवण्यात रस आहे. पण याबाबत अजूनही दोन्ही मंडळांमध्ये चर्चा झालेली नाही. दोन्ही मंडळांमध्ये सखोल चर्चा झाल्यावर हे सामने कुठे खेळवायचे हे ठरवता येईल.
अनुराग ठाकूर, बीसीसीआयचे सचिव