डिसेंबरमध्ये भारतात मालिका आयोजनाचा प्रस्ताव
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तान क्रिकेट संघाला डिसेंबरमध्ये भारतात मालिका खेळण्यासाठीचे निमंत्रण दिले आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (पीसीबी) शहरयार खान यांनी दिली. शनिवारी लाहोरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शहरयार यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, ‘‘शुक्रवारी शशांक मनोहर यांनी माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. भारत-पाकिस्तान मालिकेसाठी केंद्र सरकारने मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले, परंतु ही मालिका संयुक्त अरब अमिरातीऐवजी भारतात खेळविण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.’’ बीसीसीआय पाकिस्तानच्या खेळाडूंचा सर्वोत्तम सुरक्षा पुरवणार असल्याची शाश्वतीही मनोहर यांनी दिल्याचे शहरयार यांनी सांगितले. ‘‘आमच्या संघाला सर्वोत्तम सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या मालिकेतील सामने मोहाली आणि कोलकाता येथे खेळविण्यात येतील. बीसीसीआयकडून आमच्या महसुलात कोणताही तोटा होणार नाही याचीही काळजी घेण्यात येणार आहे,’’ असे शहरयार यांनी सांगितले.
बीसीसीआयकडून मालिका भारतात खेळविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असला तरी सामंजस्य करारानुसार ती संयुक्त अरब अमिराती येथे खेळविण्यात यावी, असे मत पीसीबी अध्यक्षांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘पाकिस्तानला डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध मालिका खेळण्यास काहीच हरकत नाही. मात्र, या मालिकेच्या आयोजनाचा मान आमचा असताना आम्ही ती भारतात का खेळावी. सामंजस्य करारानुसार अमिराती येथे ती खेळवली गेली पाहिजे. भारतात आमच्या संघाच्या सुरक्षेचा प्रश्न आहेच. तसेच जवळपास ५० कोटी डॉलरची मिळकत या मालिका आयोजनातून आम्हाला अपेक्षित आहे.’’
मनोहर यांच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचा अधिकार एकटय़ाला नसल्याचे शहरयार यांनी स्पष्ट केले. १७ नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा केली जाईल. ते म्हणाले, ‘‘कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्वप्रथम पंतप्रधानांकडून मला मान्यता मिळवावी लागेल. सध्याच्या घडीला मी बीसीसीआयला लेखी प्रस्ताव पाठवायला सांगितला आहे.’’

हे चुकीचे विधान आहे. भारत-पाकिस्तान मालिकेसाठी अद्याप आम्ही केंद्र सरकारशी संपर्क साधलेला नाही. शहरयार यांच्याशी मी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि येत्या काही दिवसांत पुन्हा आमच्यात चर्चा होईल.
– शशांक मनोहर, अध्यक्ष, बीसीसीआय