पीसीबीचे अध्यक्ष शहरयार यांचे वक्तव्य
भारत- पाकिस्तान यांच्यातील मालिकेच्या आशा मावळत चालल्या आहेत, असे वक्तव्य पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी केले आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज इस्लामाबादमध्ये आल्यावर या मालिकेबाबत तोडगा निघेल अशी पीसीबीला आशा होती. पण स्वराज यांनी मालिकेबाबत कुठलीच चर्चा केली नाही. त्यामुळे ही मालिका न होण्याची शक्यता दिसत आहे.
‘‘सुषमा स्वराज यांच्या भेटीने भारताविरुद्धच्या मालिकेबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी आम्हाला आशा होती. पण तसे काहीही घडले नसल्याने आम्ही निराश झालो आहोत,’’ असे खान यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘आम्हाला ही मालिका खेळवण्याची इच्छा आहे; पण भारताकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. मालिकेला आधीच फार उशीर झाला आहे. त्यामुळे मालिकेच्या आयोजनासाठी जास्त वेळ उरलेला नाही. याबाबत अजूनही चर्चा होत नसल्याने मी निराश झालो आहे. यापुढे काय होईल, हे मला माहीत नाही. पण भारताकडून होणारा उशीर आणि स्तब्धता पाहता ही मालिका त्यांना खेळायची नसल्याचेच जाणवते आहे.’’