जकार्ता : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने आपल्या अनुभवाच्या जोरावर पराभवाची नामुष्की टाळत डेन्मार्कच्या बिगरमानांकित मिया ब्लिटफेल्ड हिचे आव्हान परतवून लावले. दुसऱ्या फेरीत रोमहर्षक विजय मिळवत सिंधूने इंडोनेशिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

पाचव्या मानांकित सिंधूने एक तास दोन मिनिटे रंगलेल्या या लढतीत २१-१४, १७-२१, २१-११ असा विजय प्राप्त केला.

जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्या मियाविरुद्धचा सिंधूचा हा या वर्षांतील तिसरा विजय ठरला. याआधी इंडिया खुल्या आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने मियाला सरळ गेममध्ये पराभूत केले होते.

सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तिसऱ्या मानांकित नोझोमी ओकुहारा हिच्याशी लढत द्यावी लागेल.

पहिल्या गेममध्ये सिंधूने ६-३ अशी आघाडी घेत शानदार सुरुवात केली होती. त्यानंतर मियाने कडवी लढत देत ६-६ अशी बरोबरी साधली. सिंधूने आपला खेळ उंचावत त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. प्रदीर्घ रॅलीवर भर देत सिंधूने स्मॅशेसचे अप्रतिम फटके लगावले. त्यामुळे पहिला गेम २१-१४ असा जिंकण्यात सिंधूला फारसे प्रयास पडले नाहीत.

दुसऱ्या गेममध्ये दोघींनीही तोडीस तोड खेळ केल्यामुळे सामना १०-१० अशा बरोबरीत होता. मात्र सिंधूच्या चुकांचा फायदा उठवत मियाने आघाडी घेतली आणि दुसरा गेम जिंकून सामन्यात बरोबरी साधली. निर्णायक गेम मात्र एकतर्फी झाला. सिंधूच्या नियंत्रित खेळापुढे मियाचे काहीच चालले नाही. तत्पूर्वी, सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या पुरुष दुहेरी जोडीला अव्वल मानांकित मार्कस फेरनाल्डी गिडेन आणि केव्हिन सुकामुल्जो यांच्याकडून दुसऱ्या फेरीत १५-२१, १४-२१ अशी हार पत्करावी लागली.