News Flash

विजेतेपदाची पुन्हा हुलकावणी!

पी. व्ही. सिंधूवर सहज मात करून अकाने यामागुचीची अजिंक्यपदावर मोहोर

पी. व्ही. सिंधूवर सहज मात करून अकाने यामागुचीची अजिंक्यपदावर मोहोर

रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत कॅरोलिन मरिनकडून स्वीकारलेला पराभव, गतवर्षी झालेल्या राष्ट्रकुलमध्ये भारताच्याच सायना नेहवालकडून पत्करलेली हार व आशियाई स्पर्धेत पुन्हा एकदा विजेतेपदाने दिलेली हुलकावणी.. या सर्व पराभवांच्या पाश्र्वभूमीवर निदान इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तरी विजेतेपद मिळवून पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत कच खाण्याची मालिका खंडित करील, अशी आशा सर्व भारतीय करत होते. मात्र जपानच्या अकाने यामागुचीने रविवारी सिंधूला अगदी आरामात धूळ चारून तिला वर्षांतील पहिल्या विजेतेपदापासून वंचित ठेवले.

५१ मिनिटे रंगलेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत चौथ्या स्थानी असणाऱ्या अकाने यामागुचीने सिंधूचा २१-१५, २१-१६ असा सहज पाडाव केला. अजिंक्यपद मिळवण्यासाठी लागणारी मानसिक कणखरता व आक्रमक शैली यांचा अभाव सिंधूच्या खेळात प्रामुख्याने आढळला.

जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या २४ वर्षीय सिंधूला गतवर्षी जकार्ता येथेच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ताई झू यिंगविरुद्ध अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. याव्यतिरिक्त, गतवर्षीच्या भारत व थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धेतही सिंधूला अनुक्रमे बैवेन झँग व नोझोमी ओकुहारा यांच्याकडून सुवर्णपदकासाठीच्या सामन्यातच पराभव स्वीकारावा लागला होता.

पहिल्या गेमपासूनच यामागुचीने सामन्यावर वर्चस्व मिळवताना सलग तीन गुण मिळवले. मात्र सिंधूने झोकात पुनरागमन करून ५-४ अशी आघाडी मिळवली. मध्यंतराला सिंधूने ११-८ अशी आघाडी मिळवल्यामुळे यामागुचीवर दडपण निर्माण झाले. परंतु तिने हार न मानता सिंधूला चुकीचे फटके खेळण्यास भाग पाडले. १४-१४ अशी बरोबरी असताना यामागुचीने सिंधूच्या बॅकहँडला लक्ष्य करत १६-१४ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर मात्र यामागुचीने सिंधूला डोके वर काढू देण्याची संधीच न देता २१-१५ अशा फरकाने पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये यामागुचीने मध्यंतराला ११-८ अशी आघाडी घेतली. सिंधूने क्रॉस कोर्ट फटक्यांचा वापर करून यामागुचीला थकवण्याचे प्रयत्न केले. परंतु तरीही सिंधूने क्षुल्लक चुका केल्यामुळे यामागुचीने १५-१० अशी आघाडी टिकवली. यानंतरच्या गुणासाठी तब्बल ५१ फटक्यांची रॅली रंगली. परंतु सिंधूचा शटलच्या दिशेचा अंदाज चुकल्याने यामागुचीने गुण मिळवला. यादरम्यान यामागुचीच्या उजव्या गुडघ्याला काहीशी दुखापतदेखील झाली, परंतु तिने वेळेत उपचार करत कोर्टवर परतून १९-१५ अशी आघाडी मिळवली. जिंकण्यासाठी अवघा एक गुण आवश्यक असताना २२ वर्षीय यामागुचीने जोरदार स्मॅश लगावून सिंधूला नेस्तनाबूत करत २१-१६ अशा फरकाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

डिसेंबर २०१८ मध्ये वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावल्यानंतर सिंधूला अद्याप एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. या वर्षांत सिंधूने सिंगापूर आणि भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

सिंधू आणि यामागुची यांच्यात झालेला हा १५वा सामना होता. यामागुचीने सिंधूविरुद्ध मिळवलेला हा पाचवा विजय ठरला. गतवर्षी ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत यामागुचीने सिंधूला पराभूत केले होते. त्याचप्रमाणे यामागुचीने जर्मन आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेनंतर वर्षांतील तिसरे विजेतेपद मिळवले.

यामागुचीने सर्वोत्कृष्ट खेळ केला. जर मी अधिक लांब रॅलीज खेळू शकले असते, तर सामन्याचा निकाल वेगळा असता. यामागुचीचा बचावही आक्रमणाइतकाच ताकदवान असल्यामुळे तुम्हाला तिच्याविरुद्ध एखादी चूकही महागात पडू शकते.     – पी. व्ही. सिंधू, भारतीय बॅडमिंटनपटू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2019 12:50 am

Web Title: indonesia open pv sindhu mpg 94
Next Stories
1 मी चुकलो, पण निर्णयाचे शल्य नाही -धर्मसेना
2 सचिन तेंडुलकरच्या एका कौतुकाच्या फोनमुळे हिमा दासचा आनंद द्विगुणित
3 विंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, अनेक तरुण खेळाडूंना संधी
Just Now!
X