फुटबॉल मैदानात प्रतिस्पर्धी खेळाडुला गोल करण्यापासून रोखताना झालेल्या धडकेत इंडोनेशियाच्या गोलकिपरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चोईरुल हुडा असं या गोलकिपरचं नाव आहे. रविवारी इंडोनेशियातील एका स्थानिक सामन्यात चोईरुल खेळत होता. यावेळी समोरुन गोल करण्यासाठी येणाऱ्या खेळाडूच्या गुडघ्याचा जोरदार फटका लागल्याने चोईरुल जागीच कोसळला.

व्हिडिओ फुटेजमध्ये हुडा या अपघातानंतर छाती पकडून मैदानात विव्हळताना दिसत होता. या घटनेनंतर चोईरुलला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र, तोपर्यंत चोईरुलचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात आणण्यापूर्वीच चोईरुलला हृदयविकाराचा झटका आला. यामध्येच त्याचा मृत्यू झाला.

पेरेसेला लामोंगन या स्थानिक क्लबकडून चोईरुल फुटबॉल खेळत होता. १९९९ पासून फुटबॉल खेळणाऱ्या चोईरुलने आतापर्यंत ५०३ सामन्यांमध्ये आपल्या क्लबचं प्रतिनिधित्व केलं होतं. चोईरुलच्या अशा अकाली जाण्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

सामना संपल्यानंतर संघातील सर्व खेळाडूंनी चोईरुलला पाहण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली होती. चोईरुलचं जाणं आपल्या क्लबसाठी सर्वात दुर्दैवी गोष्ट असल्याचं प्रशिक्षक अजि सांतोस यांनी म्हणलंय. त्यामुळे चोईरुलच्या जाण्याने सध्या इंडोनेशियातील स्थानिक क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.