भारतीय महिला संघाने न्यूझीलंडमध्ये सुरु असलेली एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताला हार पत्करावी लागली, पण पहिल्या दोन सामन्यातील विजयाच्या जोरावर भारताने मालिका खिशात घातली. २८ धावांत ४ बळी टिपणाऱ्या अना पीटरसन हिला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तर मराठमोळी स्मृती मंधाना ‘मालिकावीर’ ठरली.

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निणर्य सार्थ ठरवला. पीटरसनने ४ बळी टिपले तर ताहुहूने २६ धावांत ३ बळी घेतले. भारताकडून २०० वा सामना खेळणाऱ्या कर्णधार मिताली राजला छाप उमटवता आली नाही. भारताकडून केवळ दीप्ती शर्माने अर्धशतकी (५२) खेळी केली. त्याच्या बळावर भारताला १४९ धावांपर्यंत मजल मारता आली.

या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने हे आव्हान ८ गडी राखून पूर्ण केले. सलामीच्या जोडीने न्यूझीलंडसाठी २२ धावा केल्या. पण त्यानंतर कर्णधार सॅथरर्व्हाइट आणि सुझी बेट्स यांनी डावाला आकार दिला. न्यूझीलंडने शंभरी पार केल्यानंतर सुझी बेट्स ५५ धावांवर बाद झाली. त्यानंतर सॅथरर्व्हाइटने नाबाद ६६ धावा करून न्यूझीलंडला सामना जिंकवून दिला.