भारतीय महिला संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात आफ्रिकेवर ८ गडी राखून सहज विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकेच्या संघाचा डाव केवळ १६४ धावांवर आटोपला. त्यानंतर प्रिया पुनिया (७५*) आणि जेमायमा रॉड्रीग्ज (५५) या दोन सलामीवीरांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हे आव्हान केवळ २ गड्यांच्या मोबदल्यात पार पाडले. भारतीय महिला संघाचा हा सलग १७ वा एकदिवसीय विजय ठरला. त्याचसोबत भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी केली.

आफ्रिकेने भारताला १६४ धावांचे माफक आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारती सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली.

प्रिया पुनिया आणि जेमायमा रॉड्रीग्ज

एकदिवसीय कारकिर्दीत पदार्पण करणाऱ्या प्रिया पुनिया हिने नाबाद ७५ धावांची खेळी केली. तिला मुंबईच्या जेमायमा रॉड्रीग्जने चांगली साथ दिली. पण अर्धशतक झाल्यावर ती ५५ धावांवर बाद झाली. पण प्रियाने डाव पुढे नेत भारताला सामना जिंकवून दिला. पहिल्याच सामन्यात विजयी खेळी करणाऱ्या प्रियाला सामनावीर घोषित केले.

त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा निर्णय फसला. झुलन गोस्वामीने केलेल्या भेदक माऱ्यामुळे त्यांच्या डावाची सुरूवात अत्यंत खराब झाली. मॅरिझॅन कॅप हिने सर्वाधिक ५४ धावा करत काही काळ झुंज दिली. पण इतर फलंदाजांची तिला साथ मिळाली नाही. त्यामुळे आफ्रिकेचा डाव १६४ धावांत आटोपला. झुलनने ३ तर शिखा पांडे, एकता बिश्त आणि पुनम यादव यांनी २-२ गडी बाद केले.