येत्या काही दिवसांत होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्रशासकीय समितीच्या बैठकीत करोनाच्या साथीचे आव्हान पेलतानाची जैव-सुरक्षेबाबतची प्रमाणित कार्यपद्धती, संयुक्त अरब अमिरातीवर शिक्कामोर्तब, वेळापत्रक   आणि प्रक्षेपणाची वेळ हे विषय ऐरणीवर असतील.

करोनाच्या वाढत्या साथीमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर पडली असताना अमिरातीमध्ये ‘आयपीएल’ आयोजित करण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) गांभीर्याने विचार करीत आहे. प्रशासकीय समितीच्या बैठकीत तीन महत्त्वाच्या विषयांवर निर्णय अपेक्षित आहे.

१. अमिरातीमध्ये आयोजन, वेळापत्रक

केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर ‘बीसीसीआय’ अमिराती क्रिकेट मंडळाशी चर्चा करू शकेल. आतापर्यंतच्या पद्धतीनुसार ६० सामन्यांचे वेळापत्रक तयार केले जाईल. प्रत्येक संघ साखळीत १४ सामने खेळेल. आधीच्या वेळापत्रकात पाच दुहेरी सामन्यांचा समावेश होता. नव्या वेळापत्रकात दिवसांची संख्या वाढल्यास वेळापत्रकही बदलेल.

२. जैव-सुरक्षेचे संघांसाठी नियम, सराव सुविधा

अमिरातीमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, शेख झायेद स्टैडियम आणि शारजा अशी तीन मैदाने आहेत. याचप्रमाणे सरावासाठी ‘बीसीसीआय’ हे आयसीसी अकादमीचे मैदान भाडय़ाने घेऊ शकते. या ठिकाणी ३८ कृत्रिम खेळपट्टय़ा, सहा बंदिस्त खेळपट्टय़ा यांच्यासह फिजिओथेरपी आणि वैद्यकीय केंद्राचीही व्यवस्था आहे.

३. भारतात प्रक्षेपणाच्या वेळेची समस्या

स्टार स्पोर्ट्स या प्रक्षेपणकर्त्यां वाहिनीला सामन्यांच्या वेळेची समस्या सोडवावी लागणार आहे. भारतात रात्री आठ वाजता सामना दाखवायचा असेल, तर तो दुबईत साडेसहाला सुरू करावा लागणार आहे. कारण दोन देशांमध्ये दीड तासाचे अंतर आहे. याचप्रमाणे सामना भारतात साडेसात वाजता दाखवता यावा, हा पर्यायसुद्धा चर्चेत आहे.

‘आयपीएल’साठी घरातूनच समालोचन?

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात गृहसमालोचनाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर येत्या ‘आयपीएल’मध्येही हेच सूत्र वापरले जाण्याची दाट शक्यता आहे.रविवारी सेंच्युरियन पार्क येथे झालेल्या सामन्याचे अगणित किलोमीटर अंतरावरून इरफान पठाणने बडोद्याहून, दीप दासगुप्ताने कोलकात्यातून आणि संजय मांजरेकरने मुंबईतून समालोचन केले होते. करोनाच्या साथीमुळे जागतिक क्रीडा क्षेत्रातही काही आश्चर्यकारक बदल दिसत असताना ‘आयपीएल’चे प्रक्षेपणकर्ते स्टार स्पोर्ट्ससुद्धा गृहसमालोचनाचा प्रयोग येत्या हंगामात वापरू शकतील. ‘‘गृहसमालोचनाचा अनुभव अप्रतिम होता. इंटरनेटच्या वेगाची आम्हाला सर्वाधिक चिंता होती. कारण आवाजाच्या दर्जावर त्याचा परिणाम व्हायचा. पण अशक्य मुळीच नव्हते,’’ असे पठाणने सांगितले.