30 October 2020

News Flash

टंचाईग्रस्त रांजणीत प्रतिकुलतेला ‘खो’

नरसिंह विद्यालयात ‘नरसिंह क्रीडा मंडळ’ या नावाने त्यांनी खो-खोची अकादमी सुरू केली.

ऋषिकेश बामणे, पुणे

नरसिंह क्रीडा मंडळ, पुणे

पुण्यातील मंचर गावापासून जवळपास १५ ते २० किलोमीटर अंतरावर रांजणी हे एक छोटेसे खेडेगाव वसले आहे. एकीकडे रोजच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण, विजेची कमतरता, त्याशिवाय आवश्यक सुविधांचा अभाव यांच्यासारखी असंख्य आव्हाने असताना येथे खो-खोसारख्या मैदानी खेळाची अकादमी उभी राहू शकते, असा कोणी विचारही केला नसता. मात्र खो-खो प्रशिक्षक संदीप चव्हाण यांनी हे शिवधनुष्य पेलले.

‘न थकता, न थांबता, न भांडता, सतत प्रयत्न’ या ब्रीदवाक्याला अनुसरून २००६मध्ये नरसिंह विद्यालयात ‘नरसिंह क्रीडा मंडळ’ या नावाने त्यांनी खो-खोची अकादमी सुरू केली. तेव्हापासून गेली १३ वर्षे महाराष्ट्रात अनेक उत्तमोत्तम खेळाडू घडवण्याचे काम संदीप इमानेइतबार करत आहेत. अकादमीच्या संकल्पनेविषयी विचारले असता संदीप म्हणाले, ‘‘२००२मध्ये ज्या वेळी मी येथे शिक्षक म्हणून नेमणूक झालो त्या वेळी एका स्पर्धेसाठी शालेय संघासोबत साहाय्यक म्हणून मला पाठवण्यात आले होते. तिथे आमच्या विरोधात निर्णय देऊन नामांकित संघाला विजयी करण्यात आले. त्यामुळे कुठे तरी आपल्यावर अन्याय झाला आहे, ही सल होती. आमच्या संघातील खेळाडूंचा खेळही प्रतिस्पर्धी संघापेक्षा खालच्या दर्जाचा होता. त्याच वेळी आपल्या संघालादेखील इतरांच्या तोडीसतोड बनवण्याच्या हेतूने मी खो-खोची अकादमी सुरू करण्याचे ठरवले.’’

दररोज सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी चार ते सहा या वेळेत येथे विनामूल्य खो-खोचे प्रशिक्षण दिले जाते. सध्या जवळपास ८० खेळाडू नरसिंह क्रीडा मंडळात खो-खोचे बारकावे शिकत असून खेळाडूंना विविध स्पर्धासाठी राज्याबाहेर जावे लागण्याचा सर्व खर्च शाळेतर्फे केला जातो. त्याशिवाय रयत शिक्षण संस्थेमार्फत येथील खेळाडूंना आर्थिक साहाय्यदेखील करण्यात येते.

आतापर्यंत या अकादमीने महाराष्ट्राला वीर अभिमन्यू, राणी लक्ष्मीबाई असे विविध सर्वोच्च पुरस्कार विजेते खेळाडू दिले असून पालकांनी आपल्या मुलांना खेळाकडे वळवावे, यासाठी अकादमीतर्फे मार्गदर्शन करण्यात येते. याव्यतिरिक्त ७६ राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू, ५२ सुवर्णपदक विजेते, १६ राज्यस्तरीय स्पर्धा विजेते आणि ७ स्पर्धामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे खेळाडूही अकादमीने घडवले आहेत. भविष्यातदेखील नरसिंह क्रीडा मंडळासारख्या आणखी अकादम्या उदयाला आल्यास खो-खोच्या प्रचार-प्रसारासाठी फारच लाभदायक ठरेल, असेच चित्र सध्या निदर्शनास येत आहे.

अ‍ॅथलेटिक्समध्येही छाप!

मार्च महिन्यात जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पटकावणारी काजल भोर आणि गतवर्षी मध्य प्रदेशला झालेल्या १८ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत वीर अभिमन्यू पुरस्काराला गवसणी घालणारा वृषभ वाघ हे दोघेही खेळाडू याच अकादमीने घडवले आहेत. त्याशिवाय स्नेहल जाधवने गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याबरोबरच फ्रान्स येथे झालेल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतदेखील सहभाग नोंदवला होता. याव्यतिरिक्त संदेश जाधव आणि नीलम वाघ यांनीदेखील अनुक्रमे ‘खेलो इंडिया’ व १९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धामध्ये उत्तम कामगिरी करून दाखवली.

मला स्वत:ला खो-खो खेळाची आवड होती. मात्र त्या वेळी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नव्हते. त्यामुळे या शाळेत शिक्षक म्हणून नेमणूक झाल्यावर खेळाडूंना घडवण्याची जबाबदारी मी घेतली. २००६पासून सुरू झालेल्या या अविस्मरणीय प्रवासात योगदान देता आले, याचा मला फार अभिमान वाटतो. भविष्यातदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.

– संदीप चव्हाण, नरसिंह क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक

२०१३मध्ये ज्या वेळी या विद्यालयाचा मुख्याध्यापक म्हणून रुजू झालो. त्या वेळी येथील खेळाडूंमध्ये खो-खोविषयी असलेले प्रेम व त्यांची देहबोली पाहून मी थक्क झालो. त्यामुळेच त्यांच्या कारकीर्दीसाठी शक्य तितक्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. त्याशिवाय एखाद्या स्पर्धेमुळे त्यांच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेतली. या उपक्रमाला शरद पवार आणि अनिल पाटील यांचेदेखील सहकार्य लाभले आहे.

– दशरथ तोडकर, नरसिंह विद्यालयाचे मुख्याध्यापक

नरसिंह क्रीडा मंडळानेच मला आतापर्यंतच्या कारकीर्दीत सर्व काही दिले. पाचवीमध्ये येथे आल्यापासून संदीप सरांनी माझ्या खेळावर नेहमीच फार मेहनत घेतली. त्याशिवाय ‘न थकता, न थांबता, सतत प्रयत्न’ हे ब्रीदवाक्य मला प्रोत्साहित करते. आता खुल्या गटातील आव्हानांसाठी मी सज्ज झालो असून अकादमीसाठी एकलव्य पुरस्कार जिंकण्यासाठी मी अथक परिश्रम करणार आहे.

– वृषभ वाघ, वीर अभिमन्यू पुरस्कार विजेता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 3:08 am

Web Title: information about narasimha krida mandal pune
Next Stories
1 जागतिक टेबल टेनिस स्पर्धा : साथियानसह भारताचे आव्हान संपुष्टात
2 ‘टीम इंडिया’ला विश्वचषकाची आस
3 IPL 2019 : दिनेश कार्तिकचं शतक हुकलं, कोलकात्याकडून दुसऱ्या सर्वोत्तम खेळीची नोंद
Just Now!
X