News Flash

कळा या लागल्या जीवा..

‘काही वेळेला निव्वळ खेळणं तुम्हाला आनंद देतं. केवळ टेनिस खेळण्याचा आनंद लुटण्यात काही वावगं नाही

२०१६ रिओ ऑलिम्पिकमधून घेतली माघार

‘काही वेळेला निव्वळ खेळणं तुम्हाला आनंद देतं. केवळ टेनिस खेळण्याचा आनंद लुटण्यात काही वावगं नाही हे काही लोकांच्या, प्रसारमाध्यमांच्या लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळी मी जिंकून जेतेपद पटकवायलाच हवं. दरवेळी एक यशोगाथा रचली जावी असा त्यांचा आग्रह असतो. तसं होत नसेल तर खेळण्यात काही अर्थच नाही असं त्यांना वाटतं. अनेकदा मी मागे वळून पाहतो तेव्हा स्वत:ला विचारतो, मी टेनिस खेळायला का सुरुवात केली. उत्तर येतं- ती एकच गोष्ट मला सर्वात आवडती होती. स्वप्नवत छंदाचं रूपांतर रोजीरोटीत कधी झालं कळलंच नाही. काही लोकांना माझं हे म्हणणं समजतच नाही’.
हे उद्गार आहेत रॉजर फेडररचे. निमित्त होतं ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीनंतरची पत्रकार परिषद. नोव्हाक जोकोव्हिचकडून पराभूत झाल्यानंतर ३३ वर्षांच्या फेडररवर निवृत्तीच्या प्रश्नांची सरबत्ती झाली. सार्वजनिक जीवनात शिष्टाचाराच्या संकेताचे पुरेपूर पालन करणाऱ्या फेडररचा संयम सुटला. काहीसं चिडूनच त्याने प्रत्युत्तर दिलं. त्याचा नूर पाहून प्रश्नांचा रोख दुसरीकडे वळला. हल्ली फेडररला खेळ, दर्जा, डावपेच, शैली यापेक्षा निवृत्तीचे प्रश्नच गर्दी करतात. ‘आता पुरे’ऐवजी ‘अरे आता का थांबलास’ हे उद्गार निवृत्तीची योग्य वेळ दर्शवतात. जगाच्या कानाकोपऱ्यात चाहत्यांच्या मनात घर केलेल्या फेडररची ही वेळ आलेय? या प्रश्नावर विचार-भूमिकांचे तट पडले आहेत. मात्र या सगळ्यात अर्थकारणाचा मुद्दा बाजूला राहतो.
१७ ग्रँड स्लॅम जेतेपदं, अन्य स्पर्धाची ८८ आणि दुहेरीची ८ जेतेपदं, दोन ऑलिम्पिक पदकं, जागतिक क्रमवारीत सर्वाधिक काळ अव्वल स्थानी राहण्याचा विक्रम, १००० विजय मिळवण्याचा मान असा प्रचंड दस्ताऐवज फेडररच्या नावावर आहे. साहजिकच टेनिसविश्वातल्या बहुतांशी स्पर्धा, जेतेपदं आणि विक्रम त्याच्या पोतडीत आहेत. अठरा वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत फेडररने विभिन्न पातळ्यांवर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. अचंबित करणारे सातत्य, मेहनतपूर्वक जपलेली तंदुरुस्ती, कसोशीने उंचावत नेलेला खेळाचा दर्जा आणि खेळावरचं निस्सीम प्रेम ही फेडररच्या वाटचालीचं गुणवैशिष्टय़ं आहेत. मात्र आकडेवारी पल्याडचा फेडरर जास्त महत्त्वाचा आहे. खेळभावना कशी जोपासतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे फेडरर. वागणं, बोलणं आणि एकूणच वावर या आघाडय़ांवर खराखुरा जंटलमन असलेला फेडरर जगभरातल्या अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. टेनिस जेमतेम समजणाऱ्यांनाही फेडरर आपला वाटतो कारण माणूस म्हणून त्याने जपलेली मूल्यं. पैसा, प्रसिद्धी, सुखं पायाशी लोळण घेत असतानाही फेडरर स्थितप्रज्ञ आणि नम्र असतो. जगण्याचं भान जराही सुटलेलं नाही. तर अशा लाडक्या व्यक्तिमत्त्वाला हरताना पाहणं चाहत्यांसाठी वेदनादायी आहे. तो खेळतोय म्हणजे त्याने जेतेपदाचा चषक उंचावायला हवाच असा चाहत्यांचा आग्रह आहे. फेडररला तसं वाटत नाही. कोरी पाटी ठेवून त्याला खेळायचंय, हरणं जिंकणं अलाहिदा. ग्रँड स्लॅम स्पर्धेत युवा खेळाडूंना नमवत उपांत्य तसेच अंतिम फेरी गाठणं अभिमानास्पद आहे असं फेडररला वाटतं. चाहत्यांनाही फेडररची ही घोडदौड आवडतेच. ही आवड मनी बाळगून ते अंतिम फेरीची लढत पाहतात. तिथे जोकोव्हिचसमोर फेडररला गारद होताना पाहणं त्यांना दु:ख देतं. वर्षांनुवर्षे जेतेपदाचा चषक उंचावणाऱ्या फेडररला सलग तीन वर्षे उपविजेतेपदाची थाळी घेताना पाहणं चाहत्यांना आत मनात कुठेतरी टोचतं. याच तीन वर्षांत जोकोव्हिचने खेळात आमूलाग्र सुधारणा केली आहे.जिंकण्यासाठी अख्खी दिनचर्याच त्याने बदलून टाकली आहे. त्याच्या जिंकण्याला आता प्रभुत्वाचं कोंदण लाभलं आहे. हे सगळं असलं तरी फेडरर-जोकोव्हिच लढतीत सर्वाधिक पाठिंबा फेडररलाच असतो. समाजमाध्यमांवरही फेडरर चाहते आस लावून असतात. पण फेडरर हरतो. इतक्या जवळ येऊन हरण्यापेक्षा त्याने सन्मानाने बाजूला व्हावं अशा विचारांचा कल्लोळ उठतो. टेनिसविश्वात जिंकण्यासारखं जे आहे ते जिंकून झालंय, आता मला मोकळं होऊन खेळू द्या असं फेडरर सांगतो. त्याला खेळण्याचा आनंद हवाय, चाहत्यांना जिंकण्याचा आनंद हवाय. खेळ जिंकण्यासाठी असतात. जिंकता येत नसेल तर थांबावं हा विरोधींचा युक्तिवाद. हे विरोधीही फेडररचे चाहतेच असतात, पण ग्रँड स्लॅम स्पर्धेतून त्याचं रित्या हातांनी परतणं त्यांना सहन होत नाही. भावनिक हिंदोळ्यांचे झोके वरखाली होतच राहतात.
सरत्या वर्षांतली फेडररची कमाई आहे ६७ दशलक्ष डॉलर्स. ही फक्त बक्षीस रकमांची मिळकत आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रीडापटूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. आजच्या घडीला फेडरर किमान दहा ते बारा आंतरराष्ट्रीय ब्रँड्सद्वारे प्रायोजित आहे. प्रायोजकांद्वारे मिळणारी रक्कम बक्षीस रकमेच्या अनेक पटीत आहे. अचानक निवृत्ती घेतल्यास टेनिस स्पर्धा, वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्या, संकेतस्थळं यावरील फेडररचा उल्लेख कमी होत जाईल. फेडररसाठी कोटय़वधी रुपये मोजलेल्या प्रायोजकांना ते परवडणारे नाही. फेडरर हे नाव असंख्य स्पर्धाचे मुख्य आकर्षण आहे. त्याच्या नावावर स्पर्धेच्या अर्थकारणाला चालना मिळते. इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगच्या दिल्ली टप्प्यात फेडरर काही तास भारतात होता. त्यासाठी संयोजकांनी काही कोटी रुपये खर्च केले. कारण फेडररचा महिमाच व्यापक आहे. निवृत्तीनंतरही तो खेळेल पण त्याच्या नावामागे माजी लागेल. प्रायोजकांना ते चालणारं नाही. जिंकण्यातले सातत्य पाहून जगातल्या मातब्बर कंपन्यांनी फेडररला करारबद्ध केले. हे करार तीन किंवा पाच अशा स्वरूपाचे असतात. फेडररचं जिंकण्यातलं सातत्य कंपन्यांना त्यांची वस्तू विकताना हमखास उपयोगी पडलं आहे. गेली तीन वर्षे फेडरर ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावू शकलेला नाही, पण करार कायम आहेत. जेतेपद जिंकण्यासाठीचं प्रायोजकी दडपणही कायम आहे. कितीही दिग्गज असला तरी फेडररची या बाजारू समीकरणातून सुटका नाही. चाहत्यांच्या प्रेमाइतकंच कारकीर्दीत वेळोवेळी खंबीरपणे पाठिंबा देणाऱ्या आधारस्तंभांना दुखावणे फेडररच्या तत्त्वात बसणारे नाही. खेळाच्या आनंदापेक्षाही चारचौघात सांगता न येणारी व्यावसायिक गणितं फेडररसाठी महत्त्वाची आहेत.
मनोरंजन, करमणूक ही खेळ पाहण्याची कारणं आता नफ्यातोटय़ाच्या ताळेबंदात परावर्तित झाली आहेत. शिखरावर असतानाच निवृत्त व्हावं हा मुद्दाही भावनिक म्हणून निकाली निघू शकतो. खेळाडूंबरोबरच चाहत्यांनीही बदलण्याची शिकवण फेडररच्या निवृत्तीच्या चर्चेने दिली आहे.

 

पराग फाटक
parag.phatak@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 3:49 am

Web Title: information about roger federer career
टॅग : Roger Federer
Next Stories
1 सहा संघांची पुण्यात अग्निपरीक्षा
2 झारखंडवर दणदणीत विजयासह मुंबई दिमाखात उपांत्य फेरीत
3 भारताची १४ सुवर्णपदकांची कमाई
Just Now!
X