25 September 2020

News Flash

आनंदचा वारसदार

किती योगायोग असतो. ज्या वेळी भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याची विश्वविजेतेपदाची मालिका त्याच्या गावातच मॅग्नस कार्लसनकडून खंडित होणार हे स्पष्ट झाले होते.

| November 30, 2013 01:14 am

किती योगायोग असतो. ज्या वेळी भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याची विश्वविजेतेपदाची मालिका त्याच्या गावातच मॅग्नस कार्लसनकडून खंडित होणार हे स्पष्ट झाले होते. त्याच वेळी आनंदच्याच गावात म्हणजे चेन्नईत एका चौदा वर्षीय बुद्धिबळपटूने चेन्नई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले होते. वयाने दुप्पट व अनुभवाने तिप्पट असलेल्या अनेक खेळाडूंना पराभूत करीत या खेळाडूने आपण आनंदचा वारसदार आहोत याचीच झलक दाखविली. हा खेळाडू आहे अरविंद चिदंबरम.
आनंद व कार्लसन यांच्यातील विश्वविजेतेपदाच्या लढतीच्या वेळी बुद्धिबळास साजेसे वातावरण निर्माण व्हावे या दृष्टीने तेथे चेन्नई आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत परदेशातील अनेक ग्रँडमास्टर व आंतरराष्ट्रीय मास्टर्स खेळाडूंनी भाग घेतला होता. अग्रमानांकित इव्हान पोपोव्ह याच्यासह २१ ग्रँडमास्टर्स व ३० ग्रँडमास्टर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल अशी अपेक्षा होती. तथापि अरविंद याने अकरा फेऱ्यांमध्ये नऊ गुण मिळवित अजिंक्यपद पटकावित सर्वाना चकित केले. त्यामध्ये त्याने ड्रॅसिक सिनिसा (सर्बिया), तेरसाहकीन सामवेल (अर्मेनिया), ललित बाबू व एम. शामसुंदर (भारत) या ग्रँडमास्टर खेळाडूंना पराभवाची चव चाखावयास दिली. तसेच त्याने शेवटच्या फेरीत ग्रँडमास्टर विष्णुप्रसाद याला बरोबरीत रोखले. त्याची या स्पर्धेतील कामगिरी २७२८ गुणांकनाइतकी झाली व त्याला या स्पर्धेत दोन लाख रुपयांच्या पारितोषिकाबरोबरच तब्बल ८० मानांकन गुणांची कमाई झाली. तो आता २४०० मानांकन गुणांवर पोहोचला आहे. त्याने ग्रँडमास्टर किताबाचा पहिला निकषही पूर्ण केला.
बुद्धिबळातील सनसनाटी लहान खेळाडू म्हणून ख्याती मिळविलेल्या अरविंद याला आतापर्यंत बराच संघर्ष करावा लागला आहे. तो जेमतेम तीन वर्षांचा असताना त्याचे पितृछत्र हरपले. त्याची आई देवयानी ही आयुर्विमा मंडळाची एजंट म्हणून काम करते. देवयानीच्या आई-वडिलांना बुद्धिबळाची खूप आवड व आनंदचे ते अतिशय चाहते असल्यामुळे अरविंदला बालपणीच बुद्धिबळ शिकविण्यास सुरुवात केली. त्याने राज्य स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये पारितोषिकांची लयलूट केली. त्याचे हे यश पाहून व त्याची घरची बेताचीच आर्थिक स्थिती पाहून त्याला वेल्लमल प्रशालेने मोफत शालेय शिक्षणाची सुविधा दिली.
अरविंद याने ११ वर्षांखालील व १३ वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले त्यावेळी तो दहा वर्षांचाही नव्हता. दोन वर्षांपूर्वी त्याने १९ वर्षांखालील गटाचे राष्ट्रीय विजेतेपद मिळविले, त्या वेळी तो फक्त बारा वर्षांचा होता. अरविंद याने स्लोव्हेनियात झालेल्या जागतिक युवा क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळात रौप्यपदकाची कमाई केली.
 त्याच्याकडील हे नैपुण्य पाहून ग्रँडमास्टर आर.बी.रमेश याने त्याला आपल्या बुद्धिबळ गुरुकुल अकादमीत सरावाची संधी दिली तेही एक पैसा न घेता. आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्यासाठी परदेशातील अव्वल दर्जाचे प्रशिक्षण व स्पर्धात्मक सरावाची आवश्यकता असते. त्याच्याकडे जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण आहेत. या दृष्टीनेच अरविंद याला प्रायोजकत्व मिळवून देण्यासाठी रमेश यांनी खूप खटाटोप केला आहे. त्याच्या प्रयत्नांना यशही मिळाले आहे. तेल व नैसर्गिक वायू मंडळ तसेच लक्ष्य फाउंडेशन यांनी अरविंद याला आर्थिक प्रायोजकत्व दिले आहे.
अरविंद हा जलद गतीने चाली करण्याबाबत ख्यातनाम आहे. त्याच्या खेळातील शैली विश्वनाथन आनंदच्या शैलीसारखी मिळती जुळती आहे. त्यालाही आनंदप्रमाणेच विश्वविजेतेपदाला गवसणी घालायची आहे. आनंद याने या खेळात जी दिमाखदार परंपरा निर्माण केली आहे. त्या परंपरेतील एक शिलेदार होण्याचेच अरविंदचे स्वप्न आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2013 1:14 am

Web Title: inheritor of viswanathan anand
Next Stories
1 दुबळ्या गोलंदाजीमुळे विश्वविजेतेपद टिकवणे भारताला कठीण जाईल -रणतुंगा
2 ड्रेसिंगरुममध्ये संगणक म्हणजे व्यत्यय वाटायचा -सचिन तेंडुलकर
3 गोल्डन ग्रां.प्रि. कुस्ती स्पर्धा : कुस्ती महासंघांमधील मतभेदांमुळे योगेश्वर दत्त स्पर्धेपासून वंचित
Just Now!
X