19 November 2017

News Flash

मैदानात ‘राज’ करणाऱ्या मितालीची अशी झाली क्रिकेटमध्ये एन्ट्री

ती मुलांसोबत क्रिकेट खेळायची

ऑनलाइन टीम | Updated: July 17, 2017 1:08 PM

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. नुकताच तिने ६ हजार धावांचा टप्पा पार करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा करिष्मा केला. मिताली राजला तसा क्रिकेटचा वारसा आहे. कारण तिची आई लीला राज या क्रिकेटर होत्या. तर वडील दुराई राज एअरफोर्समध्ये अधिकारी होते. सुरुवातीला मितालीला क्रिकेटमध्ये फारसा रस नव्हता. या काळात तिने शास्त्रीय नृत्यकला अवगत करण्यास प्राधान्य दिले. तामिळ कुटुंबात जन्मल्यामुळे ती नृत्यकलेकडे वळली.
पण वडिलांच्या एका निर्णयामुळे तिच्या आयुष्याला एक नवी दिशी मिळाली. एअरफोर्समध्ये असल्याने तिचे वडील शिस्तबद्ध होते. त्यांना मितालीचा आळशीपणा बिलकूल आवडायचा नाही. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी मितालीच्या हाती बॅट दिली. त्यानंतर मितालीला या खेळात आवड निर्माण झाली. तिने याच क्षेत्रात करिअर करण्याचे पक्के केले.

हैदराबादमध्ये शालेय स्तरावर ती मुलांसोबत क्रिकेट खेळायची. दिवसेंदिवस तिचा खेळ बहरत गेला. वयाच्या सतराव्या वर्षी तिला भारतीय संघात स्थान मिळाले. १९९९ मध्ये ऑयर्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात तिने ११४ धावांची दमदार कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवणाऱ्या मितालीला कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी तब्बल तीन वर्षे प्रतिक्षा करावी लागली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तिने आपल्या कसोटी क्रिकेटला सुरुवात केली. पदार्पणाच्या वर्षीच बलाढ्य इंग्लंडविरुद्ध तिने द्विशतक झळकावले. २००४ मध्ये मितालीकडे भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले. तिच्या नेतृत्त्वाखाली २००५ मध्ये भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. क्रिकेटच्या मैदानातील चांगल्या कामगिरीमुळे तिला अर्जुन पुरस्कार (२००३) आणि पद्मश्री पुरस्कारने (२०१५) सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर काही काळ भारतीय संघाचे नेतृत्त्व झुलन गोस्वामीकडे देण्यात आले. मात्र पुन्हा मितालीकडे नेतृत्त्वाची धूरा देण्यात आली. तिच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकात दमदार कामगिरी करत आहे.

 

First Published on July 17, 2017 1:08 pm

Web Title: inindian womens captain mithali raj cricket entry full story