करोनामुळे महाराष्ट्रातील सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या असून या २१ दिवसांच्या टाळेबंदीदरम्यान मैदानावर रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी आता महाराष्ट्रातील खेळाडू पुढे सरसावले आहेत.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा नौशाद शेख याच्यासह निकित धुमाळ, सूरज शिंदे (२३ वर्षांखालील संघाचा सदस्य) तसेच २३ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचा कर्णधार यश क्षीरसागर आणि रणजी संघाचे मसाजर शुभम चव्हाण यांनी समाजमाध्यमांवर ‘गेमचेंजर्स सहायता निधी’ असा एक समूह बनवून आतापर्यंत दीड लाख रुपये जमा केले आहेत.

नौशाद म्हणाला की, ‘‘स्थानिक पंचांकडून आम्ही प्रेरणा घेऊन हे पाऊल उचलले आहे. आम्ही जमा के लेल्या निधीतून आता मैदानावर काम करणारे कर्मचारी तसेच झोपडपट्टीत राहणाऱ्या गरजू लोकांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तू देणार आहोत. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर अन्य राज्यांतील खेळाडूही आम्हाला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. माजी क्रिके टपटू पुनित बालन यांनी आम्हाला ५० हजार रुपयांची मदत केली आहे.’’

‘‘महाराष्ट्र संघातील सत्यजित बच्छाव, ऋतुराज गायकवाड यांच्यासह आदित्य सरवटे (विदर्भ), प्रशांत परमेश्वरन आणि मनन वोहरा (पंजाब) यांनीही आम्हाला मदत केली आहे. सुरुवातीला १०० कु टुंबांना मदत करण्याचा आमचा विचार आहे. त्यांना आम्ही तांदूळ, गहू आणि साखर यांच्यासह अन्य गरजेच्या वस्तू देणार आहोत,’’ असेही नौशादने सांगितले.

हरभजनची पाच हजार कुटुंबांना मदत

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा फिरकीपटू हरभजन सिंग याने जालंधर येथील पाच हजार गरजू व्यक्तींना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी त्याला पत्नी अभिनेत्री गीता बासरा हिचीही मदत लाभत आहे.

‘‘देवाच्या कृपेने पत्नी गीता हिच्यासह आम्ही जालंधरमधील ५ हजार कु टुंबांना जीवनावश्यक गोष्टींचे वाटप करत आहोत. या खडतर परिस्थितीत आपले कु टुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी झटणाऱ्या कु टुंबांना आम्ही मदत करत आहोत,’’ असे हरभजनने म्हटले आहे. मुंबईत राहून हे वाटप कसे करतोस, असे विचारल्यावर हरभजन म्हणाला, ‘‘पूर्वी आम्ही दौलतपुरी येथे राहायचो. माझ्या जवळच्या मित्रांनी आपल्या भागातील ५०० कु टुंबांना ही मदत पोहोचवली आहे. पंजाबच्या उपायुक्तांशी बोलून मित्र-मैत्रिणींच्या साथीने माझे हे काम सुरू आहे.’’

सर्बियाच्या फुटबॉलपटूला तीन महिने घरी राहण्याची शिक्षा

बेलग्रेड (सर्बिया): सर्बियाचा फुटबॉलपटू अलेक्झांडर प्रिजोव्हिक याने करोनावर नियंत्रण राखण्यासाठी लादण्यात आलेल्या टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन के ल्याप्रकरणी त्याला तीन महिने घरातच थांबण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अल-इथिहाद या सौदी अरेबियाच्या क्लबकडून खेळणाऱ्या २९ वर्षीय अलेक्झांडरने बऱ्याच जणांसह एक व्हिडियो चित्रित के ला होता. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी बेलग्रेड येथील एका हॉटेलमध्ये जाऊन अलेक्झांडरसह १९ जणांना अटक केली. संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंतच्या टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन के ल्यामुळे पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेतले होते.

घरातच थांबण्याचे आदेश असताना हे नियम पायदळी तुडवणारा अलेक्झांडर हा सर्बियाचा दुसरा फुटबॉलपटू ठरला आहे. याआधी रेयाल माद्रिदचा आघाडीवर लुक जोव्हिच याने आपल्या प्रेयसीच्या वाढदिवसाच्या समारंभाला हजेरी लावली होती.

विलगीकरणाचे नियम मोडणाऱ्या दोन रग्बीपटूंना अटक

सुव्हा (फिजी) : करोनामुळे लागू करण्यात आलेले विलगीकरणाचे नियम मोडणाऱ्या फिजीच्या दोन रग्बीपटूंना अटक करण्यात आली आहे. याचप्रमाणे ‘बेजबाबदार वर्तन’ असा ठपका ठेवत या संदर्भातील माहिती जागतिक रग्बी संघटनेला देण्यात आली आहे.

दोन व्यावसायिक रग्बीपटूंना अटक करण्यात आल्याचे फिजी रग्बी संघटनेने सांगितले. ऑलिम्पिक आणि जागतिक रग्बी स्पर्धामध्ये फिजीचा दबदबा असतो. परंतु विलगीकरणाचे नियम धाब्यावर बसवून दोन रग्बीपटूनी संपूर्ण राष्ट्राला धोक्यात घातल्याचे पंतप्रधान फ्रँक बेनिमारामा यांनी सांगितले. बेनिमारामा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरहून परतलेल्या रग्बीपटूंना नादी रुग्णालयामध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले होते, परंतु तेथून त्यांनी पलायन केले. मग फिजी पोलीस दलाने त्यांना अटक करून पुन्हा रुग्णालयात आणले. त्यांच्यावर बेजबाबदार वर्तनाबद्दल कारवाई करण्यात येणार आहे.