विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत पराभव पत्करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचा युवा वेगवान गोलंदाज लुंग एन्गिडी भारताविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे.

रविवारी दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशकडून पराभव पत्करला. या सामन्यात एन्गिडीच्या डाव्या मांडीचा स्नायू दुखावला होता. त्यामुळे चार षटके गोलंदाजी केल्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले. एन्गिडीला दुखापतीमुळे ‘आयपीएल’मधील काही सामन्यांना मुकावे लागले होते.

‘‘एन्गिडीच्या डाव्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला आठ ते १० दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे,’’ अशी माहिती दक्षिण आफ्रिका संघाचे वैद्यकीयतज्ज्ञ मोहम्मद मोसाजी यांनी दिली. डेल स्टेन तंदुरुस्त झाल्यास एन्गिडीच्या जागी तो संघात परतू शकेल. सोमवारी त्याने नेटमध्ये कसून सराव केला. मात्र भारताविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार का, याबाबत दक्षिण आफ्रिका व्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही. परंतु भारताविरुद्धच्या सामन्यासाठी हशिम अमला खेळणार आहे, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी फॅफकडे नवी रणनीती

विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात इंग्लंडकडून आणि त्यानंतर बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागल्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस चिंतेत असून भारताविरुद्ध काही नवीन समीकरणांची जुळवाजुळव करण्याच्या तो तयारीत आहे.

आफ्रिकेचा सर्वोत्तम जलदगती गोलंदाज डेल स्टेन अजून त्याच्या दुखापतीमधून सावरत असतानाच दुसरा जलदगती गोलंदाज लुंगी एन्गिडीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात खांद्याच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते.

‘‘या दोन सामन्यांमध्ये आमचे पहिले नियोजन अपयशी ठरले. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघाचे मनोधैर्य उंचावण्यासह सर्वाचा आत्मविश्वास बळकट करण्यावर भर देणार आहे,’’ असे डय़ू प्लेसिसने सांगितले.

‘‘भारतासारख्या दमदार संघाविरुद्ध खेळताना आम्हाला दमदार कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. परंतु अ‍ॅनरिच नॉर्टे विश्वचषकापूर्वीच जायबंदी तर स्टेन आणि एन्गिडी दुखापतीमधून सावरलेले नाहीत, अशा परिस्थितीत आक्रमक गोलंदाजीचा पर्याय संघाकडे नाही. त्यामुळे आहे, त्या खेळाडूंच्या क्रमवारीत फेरफार करून भारताशी झुंजावे लागणार आहे,’’ असेही डय़ू प्लेसिसने नमूद केले.