वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलच्या पाठीला झालेल्या दुखापतीनंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. मात्र शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गेल खेळणार आहे, असे विंडीजचा अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमीने सांगितले. रविवारी झालेल्या संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या साखळीमधील अखेरच्या सामन्यात गेल खेळू शकला नव्हता. परंतु उपांत्यपूर्व फेरीत तो नक्की खेळेल, असे सॅमीने सांगितले. ‘‘विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्यापासूनच उपांत्यपूर्व फेरी हे पहिले लक्ष्य आम्ही निश्चित केले होते. ती गाठल्यानंतर अंतिम विजेतेपद हे फक्त दोन सामन्यांच्या अंतरावर असते. आम्ही हे दोन सामने जिंकल्याला बराच काळ लोटला आहे,’’ असे सॅमीने सांगितले. संभाव्य विश्वविजेते आणि यजमान असल्यामुळे न्यूझीलंडच्या संघावर अधिक दडपण असेल, असे सॅमीने सांगितले.