गुरुवारपासून सुरु होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यादरम्यान जायबंदी झालेल्या पृथ्वी शॉच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा होत आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यादरम्यान सीमारेषेवर झेल पकडत असताना पृथ्वी शॉला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर उचलून न्यावं लागलं होतं.

“ज्या पद्धतीने पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला होता, ते पाहणं खरंच वेदनादायी होतं. मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे त्याची तब्येत आता सुधारते आहे. तो सध्या चालायला लागलाय, या आठवड्याच्या अखेरीस कदाचीत तो धावू शकेल अशी आम्हाला आशा आहे.” ऑस्ट्रेलियातील SEN रेडियो चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री बोलत होते.

पृथ्वी शॉ तरुण असल्यामुळे त्याच्यात प्रचंड उर्जा आहे. तसेच आपल्याला मैदानात खेळायचंय ही इच्छा त्याच्या मनात आहे. पुढील काही दिवसांमध्ये त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यास आम्ही त्याला पर्थ कसोटीमध्ये खेळवू शकतो. पर्थ कसोटीपर्यंत त्याची तब्येत म्हणवी तशी सुधारली नाही तरी तो बॉक्सिंग डे कसोटीपर्यंत बरा होईल अशी आम्हाला आशा आहे. शास्त्रींनी पृथ्वीच्या दुखापतीबद्दल अधिक माहिती दिली. 4 कसोटी सामन्यांची ही मालिका रंगतदार होईल अशी आशा शास्त्री यांनी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या त्यांच्यात मायदेशात हरवायचं असल्यास, एका खेळाडूने चांगला खेळ न करता सर्व संघाने चांगला खेळ करण्याची गरज असल्याचंही शास्त्री म्हणाले.