ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला पोटऱ्यांतील स्नायू दुखावल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाबाहेर राहावे लागणार आहे. स्टार्कच्या जागी दक्षिण ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनला संघात स्थान देण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना रविवारी अ‍ॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर १०७ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यादरम्यान स्टार्कला दुखापत झाली होती. स्टार्कने या सामन्यात सहा षटकांमध्ये २५ धावा  देत एक बळी मिळवला होता. दुखापतीमुळे स्टार्कला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले आहे. त्याला आठवडय़ाभाराची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून पुढील आठवडय़ात त्याच्या संघनिवडीबाबत निर्णय घेण्यात येईल. त्याच्या जागी केन रिचर्डसनला संधी देण्यात आली आहे, असे ऑस्ट्रेलियाच्या संघाचे फिजिओ अ‍ॅलेक्स कोऊन्टोरीस यांनी पत्रकात म्हटले आहे.