भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या इंग्लंड दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. दुखापतीमुळे काऊंटी क्रिकेटवर पाणी सोडावं लागल्यानंतर विराट कोहलीने आज बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत यो-यो फिटनेस टेस्ट दिली. बीसीसआयने भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला यो-यो टेस्ट देणं अनिवार्य केलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार कोहलीने आज महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, भुवनेश्वर कुमार, केदार जाधव या खेळाडूंसोबत यो-यो टेस्ट दिली. मात्र या टेस्टनंतर कोहलीचा निकाल राखुन ठेवण्यात ठेवण्यात आल्यामुळे त्याच्या इंग्लंड दौऱ्यातील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसू यांच्यासमोर प्रत्येक खेळाडूंनी फिटनेस टेस्ट दिली. यादरम्यान विराट कोहलीच्या खांद्याला आणि मानेला त्रास जाणवत असल्याचं पीटीआयने म्हटलं आहे. त्याच्या या दुखापतीबद्दल शंकर बसूंनी आपला अहवाल तयार केला असल्याचं समजतंय. त्यामुळे कोहलीची दुखापत बरी न झाल्यास इंग्लंड दौऱ्यातून विराट कोहलीला माघार घ्यावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी अफगाणिस्तान कसोटीदरम्यान मोहम्मद शमी यो-यो फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्याने त्याला संघातून माघार घ्यावी लागली होती. तर संजू सॅमसनलाही भारत अ संघातून माघार घ्यावी लागली होती.

भारत २७ आणि २९ जुनरोजी आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे. यानंतर ३ जुलैपासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या यो-यो टेस्टचा निकाल नेमका काय लागतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Injured virat kohli takes yo yo test ahead of uk tour
First published on: 15-06-2018 at 16:59 IST