19 January 2021

News Flash

अखेरची झुंज!

भारतापुढे दुखापतींचे आव्हान; ऑस्ट्रेलियासाठी विजय अनिवार्य

(संग्रहित छायाचित्र)

भारत-ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी

अ‍ॅडलेडच्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने अनपेक्षित ‘फिनिक्सभरारी’ घेतली. मेलबर्नवरील महाविजय आणि सिडनीमधील संस्मरणीय अनिर्णीत लढतीमुळे ऑस्ट्रेलियाचा अहंकार दुखावला आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटी लढतीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे ‘अ’ संघाप्रमाणे भासणाऱ्या भारताची कसोटी लागणार आहे.

सिडनीत दुखापतींवर मात करीत रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी झुंजार लढत देत ऑस्ट्रेलियाचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. जसप्रीत बुमराही पोटाच्या दुखापतीसह खेळला. अंगठय़ाला फ्रॅक्चर झाला असतानाही रवींद्र जडेजा पॅड बांधून सज्ज होता. सिडनीत मैदानावरील लढत चालू असतानाच प्रेक्षागृहातून वर्णद्वेषी शेरेबाजीचे आव्हानही भारताला पेलावे लागले.

बॉर्डर-गावस्कर चषक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अखेरची कसोटी जिंकणे आवश्यक आहे, परंतु भारताला चषक आपल्याकडे राखण्यासाठी ही लढत अनिर्णीत राखणेसुद्धा पुरेशी ठरेल. ब्रिस्बेनवर ऑस्ट्रेलियाच्या संघाने १९८८नंतर एकही कसोटी सामना गमावलेला नाही. त्यामुळे त्यांना मालिका गमावणार नाही, अशी आशा आहे.

*  बुमराबाबत आशा

वैद्यकीय पथक दुखापतग्रस्त बुमराच्या तंदुरुस्तीचा आढावा घेत आहे. तो चौथ्या कसोटीत खेळण्याची आम्हाला आशा आहे, असे भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले. जर बुमरा खेळू शकला नाही, तर शार्दुल ठाकूर किंवा टी. नटराजन यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकेल. वेगवान गोलंदाजांच्या बाकीच्या दोन स्थानांवर नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज यांची वर्णी लागू शकेल. रवींद्र जडेजाच्या जागी कुलदीप यादवचे पारडे वॉशिंग्टन सुंदरपेक्षा जड मानले जात आहे.

* पंत-साहा दोघेही संघात?

चौथ्या कसोटीत ऋषभ पंतवर फलंदाजीची आणि वृद्धिमान साहावर यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्याची दाट शक्यता आहे. साहाला न खेळवल्यास मयांक अगरवाल संघात परतू शकेल. परंतु त्याच्या दुखापतीचे स्वरूपही अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला तर चेतेश्वर पुजारा तिसऱ्या आणि अजिंक्य रहाणे चौथ्या स्थानावर उतरणार, हे भारताचे आघाडीचे धोरण मात्र नक्की मानले जात आहे.

  • पुकोवस्कीऐवजी हॅरिस सलामीला

खांद्याला झालेल्या दुखापतीतून सावरू न शकलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोवस्कीने चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. त्याच्या जागी मार्कस हॅरिसला संघात स्थान मिळाले आहे. सिडनीच्या पदार्पणीय लढतीत पुकोवस्कीने अर्धशतक झळकावून निवड सार्थ ठरवली होती. मात्र कसोटीच्या पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. गतवर्षी अ‍ॅशेस मालिकेत हॅरिसने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. नऊ कसोटी सामन्यांत ३८५ धावा त्याने काढल्या आहेत.

चौथ्या कसोटीसाठी प्रेक्षकसंख्येत घट

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी स्टेडियमच्या एकूण प्रेक्षक क्षमतेपैकी ५० टक्के चाहत्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. यापूर्वी ब्रिस्बेनच्या कसोटीत ७५ टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याचे ठरवण्यात आले होते. ब्रिस्बेनच्या स्टेडियमची प्रेक्षकमर्यादा ४३ हजार इतकी आहे. परंतु नव करोनाच्या शिरकावामुळे शहरात काही दिवसांपूर्वी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकसंख्येत घट करण्यात आली आहे. या कसोटीतही चाहत्यांना मुखपट्टी लावूनच खेळाचा आनंद लुटावा लागणार आहे.

ब्रिस्बेनवरील खेळपट्टीवर चेंडूंना अधिक उसळी मिळण्याची शक्यता आहे, परंतु यापूर्वीच्या तिन्ही कसोटींसाठी आम्ही अशाप्रकारच्या चेंडूंना सामोरे जाण्यासाठी पुरेशी तयारी केली होती. तिसरी कसोटी अनिर्णीत राखल्यामुळे संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास फार उंचावला असून प्रत्येकाला आपण उपलब्ध खेळाडूंसहदेखील मालिका जिंकू शकतो, याची खात्री आहे. त्यामुळे चौथी कसोटी खरेच रंगतदार होणार आहे.

– विक्रम राठोड, भारताचे फलंदाजी प्रशिक्षक

तिसऱ्या कसोटीत आम्ही आमच्या अपेक्षेनुसार खेळ करण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे आम्हाला टीकेलाही सामोरे जावे लागले. परंतु चौथ्या कसोटीत आमच्या खेळात नक्कीच सुधारणा झालेली पाहायला मिळेल. ब्रिस्बेनवरील आमची कामगिरी उत्तम असल्याने या मैदानावर खेळण्यासाठी माझ्यासह सर्व खेळाडू उत्सुक आहेत.

– टिम पेन, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

१०० फिरकी गोलंदाज नॅथन लायनचा हा कारकीर्दीतील १००वा कसोटी सामना असून ४०० कसोटी बळींचा टप्पा गाठण्यासाठी त्याला चार बळींची गरज आहे.

० ब्रिस्बेनला भारतीय संघ सहा सामने खेळला असून, यापैकी एकही सामना ते जिंकलेले नाहीत. ऑस्ट्रेलियाने मात्र पाच सामन्यांत विजय मिळवला असून, एक सामना अनिर्णीत राखला आहे.

५१ पुजाराच्या खात्यावर ६०३० धावा जमा असून, गुंडप्पा विश्वनाथ (६०८० धावा) यांना मागे टाकण्यासाठी त्याला आणखी ५१ धावांची गरज आहे.

खेळपट्टी आणि हवामानाचा अहवाल

ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या पाचही दिवसांवर पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. खेळपट्टीकडून फलंदाजीला उत्तम साथ मिळेल. वेगवान गोलंदाजांना मात्र अधिक मेहनत करावी लागेल, तर खेळपट्टीवर चेंडू अतिरिक्त उसळत असल्याने फिरकी गोलंदाज प्रभावी ठरू शकतात.

संघ

*  ऑस्ट्रेलिया (११ जण) : टिम पेन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लबूशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड.

*  भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमरा, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव.

*  वेळ : पहाटे ५ वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन १, सोनी टेन ३ आणि एचडी वाहिन्या

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:12 am

Web Title: injuries challenge india victory inevitable for australia abn 97
Next Stories
1 सायनासह भारताचे आव्हान संपुष्टात
2 बिस्तामुळे उत्तराखंडची महाराष्ट्रावर मात
3 पॅरिस सेंट-जर्मेनला नेयमारमुळे विजेतेपद
Just Now!
X