२०१९ विश्वचषकानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीवर निवृत्तीसाठी दबाव वाढत होता. मात्र धोनीने आपला निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलत, क्रिकेटमधून दोन महिने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात निवड समितीने ऋषभ पंतला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये संधी देण्याचं ठरवलं. मात्र विंडीज दौऱ्यात आणि आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत ऋषभ फलंदाजीत अपयशी ठरला. एकीकडे सोशल मीडियावर धोनीला पुन्हा संघात संधी द्या अशी मागणी होत असतानाच, धोनीने आपण नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुट्टीवरच राहणार असल्याचं जाहीर केलं. मात्र बीसीसीआयमधली सुत्रांनी इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, पाठीला झालेल्या दुखापतीमुळे धोनीला भारतीय संघात स्थान मिळत नाहीये.

अवश्य वाचा – Ind vs SA : पहिल्या कसोटीमधून ऋषभ पंतचा पत्ता कट? वृद्धीमान साहाला संधी

सुत्रांनी दिलेल्या बातमीनुसार, धोनी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत आपली पाठीची दुखापत घेऊन खेळला होता. या स्पर्धेदरम्यान धोनीची ही दुखापत आणखीन बळावली होती. यासोबतच स्पर्धेदरम्यान धोनीचं मनगटही दुखावलं होतं. त्यामुळे धोनी सध्या उपचार घेत असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत तो फिट होईल असं समजतं आहे. विंडीज दौऱ्यानंतर आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठीही धोनीचा भारतीय संघात विचार झालेला नव्हता.

अवश्य वाचा – विराटवरचा भार कमी करण्यासाठी रोहितला टी-२० चं कर्णधारपद देता येईल !

आयपीएलच्या हंगामात धोनीला पाठदुखीचा त्रास सुरु झाला होता. मोहीलीच्या मैदानावर पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीने नाबाद ७९ धावांची खेळी केली होती. या सामन्यानंतर धोनीने पहिल्यांदा आपल्या दुखापतीबद्दल माहिती दिली होती. याच कारणासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने धोनीवर निवृत्तीसाठी दबाव वाढत असताना त्याला पाठींबा देत निवृत्ती न घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे धोनी आता भारतीय संघात कधी पुनरागमन करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – टीम इंडियात चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी सुरेश रैनाही शर्यतीमध्ये