सलामीवीर रोहित शर्माची (१६१) दर्जेदार शतकी खेळी आणि अजिंक्य रहाणे (६७) आणि ऋषभ पंत (नाबाद ५८) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं पहिल्या डावात ३२९ धावांपर्यंत मजल मारली आहे. चेन्नई येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ६ बाद ३०० अशी धावसंख्या उभारली. नाबाद राहणाऱ्या ऋषभ पंत यानं आपल्या अर्धशतकी खेळीत तीन षठकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला.

दुसऱ्या दिवशी अक्षर पटेल लगेच तंबूत परतल्यानंतर एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेले. दुसऱ्या दिवशी २९ धावांत भारतानं चार गडी गमावले. एका बाजूला ऋषभ पंत विस्फोटक फलंदाजी करत होता. मात्र, त्याला एकाही फलंदाजांनी साथ दिली नाही. पहिल्या दिवशी ३३ धावांवर नाबाद असणाऱ्या ऋषभ पंतनं दुसऱ्या दिवशी आपलं अर्धशतक पूर्ण केलं. इंग्लंडकडून फिरकीपटू मोईन अलीनं सर्वाधिक चार बळी घेत भारतीय संघाचं कंबरडं मोडलं. तर वेगवान गोलंदाज ओली स्टोन यानं तीन बळी घेत भारतीय संघाला अडचणीत टाकलं. याशिवाय जॅक लीच याला दोन तर कर्णधार जो रुटला एक विकेट मिळाली.

चेपॉकच्या आव्हानात्मक खेळपट्टीचे दडपण झुगारत पहिल्या दिवशी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या गड्यासाठी १६२ धावांची भागिदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला. पहिल्या कसोटीत अपयशी ठरणाऱ्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीने धावांची गोडी दाखवत मोठ्या खेळीची संघाची अपेक्षा पूर्ण केली. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि पंत यांचा अपवाद वगळता एकाही फंलदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेतेश्वर पुजाराला (२१) चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. विराट कोहली, शुबमन गिल, इशांत शर्मा आणि कुलदीप यादव यांना खातेही उघडता आलं नाही. अश्विन यानं १३ धावांची खेळी केली. तर पदार्पणवीर अक्षर पटेल अवघ्या ५ धावांवर बाद झाला.