* स्पॉट-फिक्सिंगचा दाऊद आणि छोटा शकीलशी संबंध असल्यामुळे दिल्ली पोलिसांची कारवाई
*  २६ आरोपींचा जामीन नाकारला आणि न्यायालयीन कोठडीमध्ये १८ जूनपर्यंत वाढ
आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाचे धागेदोरे हे जागतिक दहशतवाद्यांशी निगडित असल्याचे प्रकाशात येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा साथीदार छोटा शकील यांच्याशी या प्रकरणाचे सबंध असल्यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतसहित सर्व २६ आरोपींवर ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. याचप्रमाणे त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये १८ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मुख्य महानगर दंडाधिकारी लोकेश कुमार शर्मा यांनी सांगितले की, ‘मोक्का’ लावल्यामुळे सदर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांना या आरोपींची सखोल चौकशी करता येईल. या २६ आरोपींपैकी आयपीएल खेळाडू अंकित चव्हाण आणि श्रीशांतचा मित्र अभिषेक शुक्ला जामिनावर सध्या तुरुंगाबाहेर आहेत, तर सहआरोपी अभिषेक अगरवालला मुंबईतील न्यायालयाने वॉरंट काढल्यामुळे तिथे पाठविण्यात आले आहे. या आरोपींवर आता ‘मोक्का’ लावण्यात आला असल्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर न्यायदंडाधिकाऱ्यांऐवजी अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती संजीव जैन सुनावणी करतील.
श्रीशांतसहित १६ आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे. पोलिसांनी ही परवानगी नाकारत असल्याचे सांगत आरोपींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा निर्णय घेतला.
सट्टेबाज चंद्रेश पटेलचे वकील अ‍ॅड. डी. पी. सिंग यांनी न्यायालयात सांगितले की, ‘‘जो आरोपी आपले डी-कंपनीशी संबंध असल्याचे सांगतो त्याला मुंबईत जामीन मिळतो आणि दिल्लीत मात्र ‘मोक्का’ लावला जातो. खेळाडू संघटित गुन्हेगारीचा भाग म्हणून आरोपी कसे काय असू शकतात?’’
 पोलिसांनी आधीच न्यायालयात असे सांगितले होते की, ‘‘या प्रकरणाचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी असलेल्या संबंधाचा आम्ही तपास करीत आहोत. आमच्याकडे असलेल्या दूरध्वनी संभाषणाच्या पुराव्यांआधारे अनेक मोठी नावे यात सामील आहेत. याचप्रमाणे दाऊदशीसुद्धा संवाद झाल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. या प्रकरणातील काही गोष्टी अद्याप समोर आलेल्या नाहीत, त्याचा आम्ही तपास करीत आहोत.’’
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात सापडलेले राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना बीसीसीआयने निलंबित केले आहे. याचप्रमाणे या तिघांसहित अन्य आरोपींना भारतीय दंड विधेयक कलम ४२० (फसवणूक) आणि १२०-ब (गुन्हेगारी कट) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यानंतर २१ मे रोजी पोलिसांनी आयपीएल, बीसीसीआय आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील कराराचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कलम ४०९ लागू केले होते.