कुस्तीच्या आखाडय़ावर पुनरागमन करीत आशियाई कांस्यपदकावर मोहोर

सुप्रिया दाबके, लोकसत्ता

मुंबई : मुलगी झाली म्हणून पतीने घराबाहेर काढले. पण ती डगमगली नाही. पोलिसात नोकरी करताना मुलीचा खर्च भागवण्यासाठी सात वर्षांनंतर कुस्तीच्या आखाडय़ावर पुनरागमन करण्याचा तिने निर्णय घेतला. नुकत्याच नवी दिल्लीत झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत या घटस्फोटित महिलेने कांस्यपदक मिळवले. त्यामुळेच पंजाबची ३५ वर्षीय  गुरशरण प्रीत कौर आता क्रीडाक्षेत्रात चर्चेत आहे. आयुष्यात कितीही संकटे आली तरी महिलांनी डगमगू नये, हाच सल्ला महिला दिनानिमित्त गुरशरणने दिला.

पंजाब पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या गुरशरणने कारकीर्दीत अनेक चढउतार पाहिले आहेत. २०१२मध्ये ती उत्तेजक चाचणीत दोषी आढळली होती आणि त्यासाठी नऊ महिन्यांच्या बंदीची शिक्षा झाली. त्यानंतर कुस्तीशी तिचे नाते तुटले. या कठीण कालखंडात गुरशरणच्या कुटुंबियांनी तिचे लग्न लावून दिले. मात्र लग्नानंतरचे आयुष्यदेखील गुरशरणसाठी सोपे नव्हते. हा प्रवास मांडताना गुरशरण म्हणाली, ‘‘कुस्तीचा सराव मुलांसोबत करते म्हणून माझ्या घरचे मला जेवायला द्यायचे नाहीत. त्यातच माझा पती हा अंमली पदार्थाच्या सेवनाच्या आहारी गेला होता. तो मला अनेकदा मारायचा. मुलगा व्हावा म्हणून माझ्यावर सतत दडपण आणले जायचे. ज्यावेळेस मला मुलगी झाली, त्यावेळेस माझ्या पतीने मला त्याची किंवा मुलीची निवड करण्यास सांगितले. मी अर्थातच माझ्या मुलीची निवड केली. माझ्या पतीने मला घराबाहेर काढले. तेव्हापासून माझ्या मुलीची पूर्णपणे जबाबदारी माझ्यावर आहे.’’

मग सात वर्षांनंतर गुरशरणने स्पर्धात्मक कुस्तीमध्ये पुनरागमन करण्याचे ठरवले. कारण कुस्ती खेळून मोठय़ा रकमेची बक्षिसे जिंकता येतात हे तिला ठाऊक होते. ‘‘जालंधरच्या पंजाब पोलिस अकादमीत कुस्ती सरावाला २०१८मध्ये पुन्हा सुरुवात केली. गेल्यावर्षी पानिपत येथे झालेली कुस्तीची दंगल जिंकून बक्षिसाची रक्कम मिळवली. तेव्हापासूनच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागाची जिद्द मी बाळगली. आशियाई कुस्ती स्पर्धेत जिंकलेले कांस्यपदक हे मी माझ्या आईमुळे मिळवू शकले. माझ्या मुलीचा सांभाळ माझी आई करते,’’ असे गुरशरणने सांगितले.

बालपणीपासूनच्या संघर्षांबद्दल गुरशरण म्हणाली,  ‘‘पोलिस दलात मी भरती झाले तेव्हा कुस्ती खेळत नव्हते. मात्र एकदा एका पोलिसांच्या स्पर्धेत महिला कुस्तीपटूविरुद्ध मला झुंजायला सांगितले. मी ती लढत जिंकली. तेव्हाच लक्षात आले की कुस्ती खेळून बक्षिसे मिळतील आणि घरचा खर्च भागेल. त्यातच सुरुवातीच्या दिवसांमध्ये माझे वडील मूत्रपिंड प्रत्यारोपणावर उपचार घेत होते. त्यामुळे खर्च मोठा होता. तेव्हापासूनच संघर्ष करत आहे आणि कुस्ती खेळून घरखर्च भागवत आहे,’’ असे गुरशरणने सांगितले.