भारताकडून अंतिम फेरीत निसटता पराभव स्वीकारल्यानंतर रडत बसण्यापेक्षा या सामन्यात झालेल्या चुका कशा दुरुस्त करता येतील, याचा विचार माझ्या सहकाऱ्यांनी केला पाहिजे, असे बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शकीब अल हसनने सांगितले.

बांगलादेशचा येथील तिरंगी ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत शेवटच्या चेंडूवर निसटता पराभव झाला. याबाबत शकीब म्हणाला, ‘‘हातातोंडाशी आलेले विजेतेपद हुकल्याचे दु:ख वाटणे स्वाभाविकच आहे. मात्र खेळ म्हटले की यशापयश असतेच. आतापर्यंत पाच वेळा आम्हाला अशा निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच माझ्या सहकाऱ्यांनी आपण नेमके कोठे कमी पडलो, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. भूतकाळाऐवजी भावी कारकीर्दीबाबत विचार केला पाहिजे.’’