मुंबईतील अंधेरी स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात आलेल्या आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेतील पाचव्या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताचा २-१ ने पराभव केला. भारताकडून सुनील छेत्रीने गोल करुन संघाला आघाडी मिळवून दिली होती. पण न्यूझीलंकडून आंद्रे जोंग आणि मोसेस डायरने एक-एक गोल मारत भारतीय संघाची निराशा केली. न्यूझीलंडने याआधी चौथ्या सामन्यात चीन तायपेईचा १-० ने पराभव केला होता.

आजच्या सामन्यात ४७ व्या मिनिटाला दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच सुनील छेत्रीने पहिला गोल मारत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र यानंतर लगेचच ४९ व्या मिनिटाल आंद्रे जोंगने ने गोल करुन बरोबरी केली. हाफ टाइमच्या वेळी दोन्ही संघ ०-० ने बरोबरीवर होते. सामना संपण्याच्या थोडा वेळ आधी ८६ व्या मिनिटाला मेसेस डायरने गोल करुन भारताला धक्का दिला आणि न्यूझीलंडला विजयी आघाडी मिळवून दिली.

भारताकडून आज जेजे लालपेख्लुआ याने ५० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पराभव झाला असला तरी भारत अंतिम सामन्यात पोहोचला आहे. अंतिम सामन्यात भारत केनिया किंवा न्यूझीलंडसोबत भिडेल. स्पर्धेतील अखेरचा लीग सामना चीनी तायपेई आणि केनियादरम्यान होणार आहे. मोठ्या फरकाने मिळवलेला विजय केनियाला अंतिम सामन्यात पोहोचवू शकतो. भारत आणि न्यूझीलंड सध्या ३-३ सामन्यानंतर सहा पॉईंट्सवर आहेत. केनियाचे दोन सामन्यानंतर ३ पॉईंट्स आहेत.