मुंबईमध्ये सुरु असलेल्या इंटनकॉन्टिनेंटल फुटबॉल चषक स्पर्धेत आपले सलामीचे दोन्ही सामने जिंकत, भारताने मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. सुनील छेत्रीच्या आक्रमक खेळासमोर चीन तैपेई आणि केनिया या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा निभाव लागला नाही. या स्पर्धेत भारताची पुढची लढत न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारी होणार आहे. मात्र पहिल्या दोन सामन्यांमधील सुनील छेत्रीने केलेला खेळ पाहता, न्यूझीलंडचे प्रशिक्षक फ्रित्झ स्किम्ड यांनी भारतीय संघाचा धसका घेतला आहे. सध्यातरी भारताचं आमच्यासमोर तगडं आव्हान निर्माण करेलं असं स्किम्ड यांनी मान्य केलं आहे.

अवश्य वाचा – वेल डन चॅम्प, विराट कोहलीचा सुनील छेत्रीसाठी स्पेशल मेसेज

“या स्पर्धेत आमचं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आम्हाला लवकरात लवकर खेळ सुधरवण्याची गरज आहे. दुर्दैवाने स्पर्धेच्या व्यस्त वेळापत्रकांमुळे आम्हाला सरावासाठी कमी वेळ मिळाला आहे, आणि यजमान संघाशी आमचा शेवटचा सामना असल्यामुळे आम्हाला निर्धास्त राहता येणार नाही. भारताविरुद्धचा सामना आमच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे.” मंगळवारी मुंबईत झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने चीन तैपेईचा १-० ने पराभव केला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना स्किम्ड यांनी भारतीय संघाच्या खेळावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.

अवश्य वाचा – सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करावं लागणं खेदजनक – प्रशिक्षक स्टिफन कॉन्सटनटाईन

भारत विरुद्ध चीन तैपेई सामन्यात प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद पाहून सुनील छेत्रीने, सोशल मीडियावर प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी या असं आवाहन केलं होतं. यानंतर केनियाविरुद्धच्या सामन्याची सर्व तिकीटं विकली गेली होती. योगायोगाने केनियाविरुद्धचा सामना हा छेत्रीचा शंभरावा आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यातही छेत्रीने २ गोल झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात छेत्री कसा खेळतो याकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – मेसीला मागे टाकण्यासाठी सुनील छेत्रीला फक्त चार गोलची गरज