भारताचा चायनीज तैपईवर ५-० असा दणदणीत विजय

ऋषिकेश बामणे, मुंबई</strong>

कारकिर्दीतील ९९वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर भारताने चायनीज तैपईवर ५-० असा दणदणीत विजय मिळवून आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेच्या अभियानाला धडाक्यात सुरुवात केली.

अंधेरी क्रीडा संकुलात रंगलेल्या या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यांनी चायनीज तैपईच्या गोलजाळ्यावर सतत हल्ले करताना बचावपटूंवर दडपण आणले. भारतीय आक्रमकांना रोखण्याच्या प्रयत्नातच चूक झाल्यामुळे तैपईच्या चेन टिंग यांगला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. १४व्या मिनिटाला जेजे लालपेखलुआने केलेल्या सुरेख पासच्या जोरावर छेत्रीने गोल नोंदवून भारताला आघाडी मिळवून दिली.

३४व्या मिनिटाला जेजे आणि छेत्रीच्या जोडीने पुन्हा एकदा आपली कमाल दाखवली व छेत्रीने गोलजाळ्याच्या अगदी डाव्या कोपऱ्यात चेंडू धाडून आपला दुसरा गोल केला. मध्यंतराला काही अवधी शिल्लक असताना तैपईच्या संघाने गोल करण्याचे अथक प्रयत्न केले मात्र भारतीय गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.

मध्यंतरानंतर उदांत सिंगने (४८ मि.) भारतासाठी तिसरा गोल नोंदवला. ६२व्या मिनिटाला २० वर्षीय अनिरुद्ध थापाने केलेल्या सुरेख पासचे गोलमध्ये रूपांतर करून छेत्रीने आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. प्रणॉय हाल्डेरने (७८ मि.) पाचवा गोल धडकवत भारताच्या विजयावर शिकामोर्तब केले. भरपाई वेळेत (९२व्या मिनिटाला) छेत्रीला बदली करून एलन देवरीला खेळण्यासाठी पाठवण्यात आले. छेत्री परतत असताना संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला व त्यानेसुद्धा सर्वाच्या अभिवादनाचा स्वीकार केला. भारताची पुढील लढत ४ जून रोजी केनियाशी होणार असून, तो छेत्रीचा १००वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.