सट्टेबाजांची अनधिकृत का होईना, आता आकडेवारी मिळत आहे आणि सट्टेबाजांना पहिला फटका शुक्रवारी झालेल्या स्पेन आणि नेदरलँडमधील सामन्याने बसला आहे. आश्चर्यकारकरीत्या नेदरलँडने स्पेनला ५-१ ने नमविले आणि सट्टेबाजांची गणिते चुकली. सुरुवातीला स्पेनला ६० पैसे आणि नेदरलँडला तीन रुपये देऊ करणाऱ्या भारतीय बुकींनी सामन्याचा रागरंग पाहून झुकते माप द्यायला सुरुवात केली. एका क्षणी दोघांचा भाव समान होता. मात्र सुरुवातीला देऊ केलेल्या भावामुळे अनेक पंटर्सची चांदी झाली. अशाच अनपेक्षित लढतींची पंटर्सना अपेक्षा असते आणि सट्टेबाजांना मग सावध व्हावे लागते. सोमवारी होणाऱ्या तीन सामन्यांमध्ये अशा अनपेक्षित निकालाची अपेक्षा नसली तरी जर्मनी आणि पोर्तुगाल यांच्यातील सामन्याबाबत सट्टेबाजांना उत्सुकता आहे. भारतीय बुकींना अनपेक्षित निकाल नको असतात. संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या हाती या सट्टेबाजाराची सूत्रे असल्यामुळे असा गेम फिरला तर पंटर्सना चिंता असते. पण तरीही पंटर्स आपले नशीब अजमावत असतात. त्यामुळे जर्मनी आणि पोर्तुगाल सामन्यात दोन्ही संघांना कमी भाव देण्यात आला आहे. इराण आणि नायजेरिया तसेच घाना आणि अमेरिका यांच्यातील सामन्यांबाबत पंटर्सही फारसे उत्सुक नाहीत. मात्र नायजेरियाच्या व्हिक्टर मोझेसबद्दल सट्टेबाजांना आदर आहे. कदाचित त्यामुळे तो किती गोल मारणार यावरही सट्टा घेण्यात आला आहे.
आजचा भाव :
जर्मनी            पोर्तुगाल
६५ पैसे (६/५);        सव्वा रुपया (१४/५)
इराण            नायजेरिया
अडीच रुपये (१४/५);    ९० पैसे (५/४)
घाना            अमेरिका
७० पैसे (१३/८);        दीड रुपया (९/४)

कप-शप ..आणि तो ढसाढसा रडला!
काही वेळा खेळाडूंना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही. असाच अनुभव १९९०च्या विश्वचषक स्पर्धेत पाहायला मिळाला. पश्चिम जर्मनीविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा खेळाडू पॉल गॅस्कोग्ने याच्याबाबत असाच किस्सा घडला. या सामन्यापूर्वी त्याला पिवळे कार्ड मिळाले होते. गोलफलक १-१ असताना त्याने जर्मनीच्या थॉमस बर्टहोल्ड याला धक्का देऊन पाडले. आपल्या कृत्याचे काय गंभीर परिणाम होणार याची जाणीव झाल्यानंतर त्याने ढसाढसा रडायला सुरुवात केली. त्याला रेफरीने लाल कार्ड दाखवत मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. तथापि, तो मैदानावरच बसून राहिला. इंग्लंडचा कर्णधार गॅरी लिनेकर याने अखेर संघाचे व्यवस्थापक बॉबी रॉब्सन यांना मैदानावर येण्याची विनंती केली. रॉब्सन हे मैदानावर आले व त्यांनी पॉल याला मैदानाबाहेर नेले.  निर्धारित वेळेत हा सामना बरोबरीत संपल्यानंतर अलाहिदा वेळ देण्यात आली. त्यातही बरोबरी राहिल्यामुळे पेनल्टी किकचा उपयोग करण्यात आला. लाल कार्ड दाखविल्यानंतर रडारड करणाऱ्या पॉलचा दुखवटा अद्याप संपला नव्हता. त्यामुळे त्याने पेनल्टी किकची संधी आपल्याऐवजी ख्रिस व्ॉडेलला दिली.


‘शूट आऊट. : जपानचे पाठीराखे आपल्या संघाला समर्थन देण्यासाठी झेंडा असलेला पेहराव परिधान करून मैदानात अवतरले होते.