‘‘चीनच्या खेळाडूंची मक्तेदारी मोडून काढण्याचे काम सायना नेहवाल आणि मी केले होते. आता तो कित्ता पी. व्ही. सिंधू आणि थायलंडची रत्चानोक इन्थॅनॉन गिरवीत आहेत. विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत वेगवेगळ्या देशांच्या बॅडमिंटनपटूंनी सुरेख कामगिरी केली. या स्पर्धेत सिंधू आणि रत्चानोक यांनी घेतलेली झेप कौतुकास्पद आहे,’’ असे उद्गार जर्मनीची अव्वल बॅडमिंटनपटू ज्युलियन श्चेंक हिने काढले.
‘‘रत्चानोक हिने सुवर्णपदकाची कमाई केल्याचे आश्चर्य मला वाटले नाही. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांमध्ये जेतेपदासाठी स्पर्धा वाढली आहे, ही चांगली बाब आहे. चीनची भिंत मोडीत काढण्याचा कित्ता सिंधू आणि रत्चानोकसारख्या खेळाडू पुढे नेत आहेत, याचा आनंद होत आहे,’’ असेही तिने सांगितले.
जर्मन बॅडमिंटन असोसिएशनशी असलेल्या मतभेदामुळे २०११ मध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या श्चेंकला विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होता आले नाही. ‘‘असोसिएशनशी खटके उडाल्यामुळेच मी या स्पर्धेत खेळू शकले नाही. पण माझ्यासाठी तो चांगला निर्णय होता. यापुढे मी देशाकडून कोणतीच अपेक्षा बाळगू शकत नाही. देशाकडून पाठिंबा मिळत नसताना मी त्यांचे प्रतिनिधित्व का करू, याचे दु:ख सतावत असताना मी सराव करणेही सोडून दिले होते. या परिस्थितीत बदल होण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे मी या मोसमाअखेरीस निवृत्तीची घोषणा करणार आहे. जर्मनीत माझे भवितव्य सुकर होणार नसल्यामुळे मी अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असेही श्चेंक म्हणाली.