पुरुषांच्या ३०० मीटर शर्यतीत अनास अव्वल

चेक प्रजासत्ताक येथे झालेल्या अ‍ॅथलेटिकी मिटिंक रेयटर आंतरराष्ट्रीय स्पध्रेतील ३०० मीटर शर्यतीत महिलांमध्ये हिमा दासने आणि पुरुषांमध्ये मोहम्मद अनासने सुवर्णपदकाची कमाई केली.

२ जुलैपासून हिमाने युरोपीयन शर्यतींमध्ये मिळवलेले हे सहावे सुवर्णपदक ठरले. यापैकी पाचवे सुवर्ण तिने चेक प्रजासत्ताकमधील नोव्हे मेस्टो येथे झालेल्या ४०० मीटर शर्यतीत जिंकले होते. ‘‘चेक प्रजासत्ताक येथील अ‍ॅथलेटिकी मिटिंक रेयटर स्पध्रेत ३०० मीटर शर्यतीत अग्रस्थान मिळवले,’’ असे ‘ट्वीट’ हिमाने शनिवारी स्पर्धा जिंकल्यानंतर केले.

अनासने ३२.४१ सेकंद वेळ नोंदवत पुरुषांचे सुवर्णपदक प्राप्त केले. त्याने ‘ट्विटर’वर म्हटले आहे की, ‘‘अ‍ॅथलेटिकी मिटिंक रेयटर २०१९ स्पध्रेच्या ३०० मीटर शर्यतीचे ३२.४१ सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक मिळाल्याचा अत्यंत आनंद होत आहे.’’

दोहा येथे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेच्या ४०० मीटर प्रकारासाठी राष्ट्रीय विक्रमवीर अनास आधीच पात्र झाला आहे. परंतु हिमाला अद्याप पात्र होता आलेले नाही.

जागतिक स्पध्रेसाठी पात्र होण्याची अखेरची संधी नवी दिल्लीत भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघातर्फे ५ सप्टेंबरला नवी दिल्लीत इंडियन ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले असून, जागतिक अजिंक्यपद स्पध्रेसाठी पात्र होण्याकरिता ही अखेरची संधी असेल. पुरुषांसाठी ४०० मीटर अथडळा, पोल व्हॉल्ट, लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, भाला फेक आणि ४ बाय ४०० मीटर रीले प्रकारांच्या स्पर्धाचा समावेश आहे, तर महिलांसाठी १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर आणि लांब उडी अशा स्पर्धा होतील.