सुमित सांगवान (९१ किलो), निखट झरीन (५१ किलो) आणि हिमांशू शर्मा (४९ किलो) यांनी ५६व्या बेलग्रेड आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पध्रेत सुवर्णपदकाची कमाई केली. सर्बिया येथे झालेल्या या स्पध्रेत भारतीय बॉक्सर्सनी तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि पाच कांस्यपदके पटकावली.

दुखापतीतून सावरणाऱ्या सुमितने इक्वेडोरच्या कॅस्टीलो टोरेसचा ५-० असा सहज पराभव केला. ‘‘हे पदक मी वडिलांनी समर्पित करतो. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. राष्ट्रकुल स्पध्रेसाठी केलेल्या मेहनतीचे फलित मला येथे मिळाले. या सुवर्णपदकाने माझा आत्मविश्वास अधिक उंचावला आहे,’’ असे सुमितने सांगितले.

कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतील माजी विजेत्या निखटनेही खांद्याच्या दुखापतीवर मात करताना अंतिम लढतीत ग्रीसच्या कौत्सोइऑर्गोपौलोयू एकाटेरीनीवर ५-० असा सहज पराभव केला. हिमांशूलाही सुवर्णपदकाच्या लढतीत अल्जेरियाच्या मोहम्मद टौरेगवर विजय मिळवण्यासाठी फार संघर्ष करावा लागला नाही. त्याने ५-० अशा फरकाने विजय मिळवला. महिला गटात जमुना बोरो (५४ किलो) आणि राल्टे लाल्फाकमावीई (८१ किलोवरील) यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. स्थानिक खेळाडू अँडजेला ब्रँकोव्हीकने ४-१ अशा फरकाने जमुनाचा, तर टर्कीच्या डेमिर सेन्नूरने लाल्फाकमावीईतचा ३-२ असा पराभव केला.

पुरुष गटातील अन्य लढतीत लाल्दीन्माविया (५२ किलो), वरिंदर सिंग (५६ किलो) आणि पवन कुमार (६९ किलो) यांनाही रौप्यपदकासह मायदेशी परतावे लागले. तत्पूर्वी, पुरुष गटात नरेंदर (९१ किलोवरील) आणि महिला गटात राजेश नरवाल (४८ किलो), प्रियांका ठाकूर (६० किलो), रुमी गोगोई (७५ किलो) आणि निर्मला रावत (८१ किलो) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.