|| ऋषिकेश बामणे

विश्वचषकाचा १२वा हंगाम सुरू होऊन आता तीन आठवडे उलटले आहेत. या कालावधीमध्ये चौकार-षटकारांच्या आतषबाजीशिवाय पावसाचा वर्षांवही पाहायला मिळाला. तब्बल चार सामने पावसामुळे वाया गेल्याने हिरमोड झालेल्या चाहत्यांनी साहजिकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (आयसीसी) ताशेरे ओढून इंग्लंडकडे विश्वचषकाचे यजमानपद का सोपवण्यात आले, याचा जाबही विचारला.

कोणत्या देशाकडे विश्वचषकाचे यजमानपद जाते, याचा निर्णय जवळपास १० ते १२ वर्षांपूर्वीच झालेला असतो. २००६ मध्ये ‘आयसीसी’चे सदस्यत्व असलेल्या सर्व संघांच्या अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. यादरम्यानच २००७ ते २०१९चे विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केले जाणार, हे ठरवण्यात आले. यामध्ये उपस्थित  अध्यक्षांची मते विचारात घेऊन यजमानाचा बहुमान कोणाला द्यायचा, हे निश्चित केले जाते. २००६ मध्ये झालेल्या त्या बैठकीनुसार सर्वप्रथम इंग्लंडला २०१५च्या विश्वचषकाचे यजमानपद बहाल करण्यात आले होते, मात्र इंग्लंडने माघार घेतल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांनी संयुक्तपणे यजमानपदाची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे इंग्लंडला २०१९च्या विश्वचषकाचे यजमानपद लाभले. जवळपास १३ वर्षांपूर्वी ‘आयसीसी’ने पावसाचा अंदाज घेऊन विश्वचषकाचे यजमान ठरवावे, ही अपेक्षा करणे चुकीचे ठरते.तसेच इंग्लंडमधील वातावरणाविषयी कोणीही ठामपणे भाकीत वर्तवू शकत नाही. गेल्या दोन वर्षांत मे-जून महिन्यांच्या काळात इंग्लंडमध्ये यावेळी इतका पाऊस नव्हता. परंतु यंदा पावसाचा जोर मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही सामन्यांवर पावसाचा प्रभाव पडणारच, याची विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच सर्वाना पूर्वकल्पना होती. परंतु विश्वचषकात किती संघ सहभागी होऊ शकतात, त्यापासून ते सामन्यांचे वेळापत्रक आणि स्पर्धेत कोणत्याही नव्या नियम व अटींची तरतूद करण्याचा निर्णय ‘आयसीसी’ घेते.

१९९२च्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवल्यानंतर २०११च्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनाच पुन्हा यजमानपद मिळण्याची शक्यता होती. मात्र भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या आशियाई त्रिकुटाने १०-३ अशा फरकाने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडची यजमानपदाची संधी हिरावली. त्याशिवाय या तीन देशांनी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड या देशांच्या तुलनेत ‘आयसीसी’ला अधिक नफा मिळवून देण्याची खात्री दिली होती.

‘आयसीसी’च्या धोरणानुसार एखाद्या संघाने यजमानपद सांभाळल्यानंतर किमान पुढील चार विश्वचषक पुन्हा यजमानपद दिले जाऊ नये, असे संकेत आहेत. मात्र २०११ मध्ये भारताने यजमानपद निभावल्यानंतर २०२३चा विश्वचषक पूर्णपणे भारतातच खेळला जाणार असल्याने या धोरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याशिवाय चॅम्पियन्स करंडक स्पध्रेबाबतीतही हा नियम लागू होतो. मात्र गेल्या दोन चॅम्पियन्स करंडकाचे (२०१३, २०१७) आयोजन इंग्लंडनेच केल्यामुळे ‘आयसीसी’चे या संदर्भातील धोरण शंकास्पद आहे.

१०-१२ वर्षांपूर्वीच यंदाच्या विश्वचषकाचे यजमानपद इंग्लंडकडे बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु विश्वचषकानंतर अ‍ॅशेस मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याऐवजी अ‍ॅशेस मे-जून महिन्यात आयोजित करून विश्वचषक त्यानंतर ठेवला असता तर पावसाचा इतका प्रभाव जाणवला नसता. ‘आयसीसी’च्या नव्या नियमांनुसार दर १२ वर्षांनी आशियाई देशांकडे विश्वचषकाचे यजमानपद सोपवण्याचा नियम असल्यामुळे २०११नंतर २०२३मध्ये भारताला पुन्हा विश्वचषकाचे यजमानपद मिळणार आहे.    – प्रा. रत्नाकर शेट्टी, माजी क्रिकेट प्रशासक