करोना विषाणूचा सामना करण्यासाठी मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. बीसीसीायनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र स्पर्धा रद्द होत असल्यामुळे होणार आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आयसीसीने प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांना आता हळुहळु यश येताना दिसत आहे, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ८ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार असून हे सर्व कसोटी सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या कसोटी सामन्यांसाठी सरकारला परवानगी मागितली आहे, आणि सर्व काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे झाल्यास जुलै महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिका खेळतील. लॉकडाउननंतर खेळवली जाणारी ही पहिली मालिका ठरु शकते. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, ९ जूनला वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये येणार आहे. यानंतर पुढचे काही दिवस विंडीजचा संघ स्वतःला क्वारंटाइन करुन सरावाला सुरुवात करेल. “खेळाडू आणि सामन्याचं आयोजन करण्यासाठी संबंधित प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणं हे आमचं प्रमुख उद्दीष्ट आहे. सरकार आणि वैद्यकीय विभागाशी आम्ही सतत संपर्क ठेवून आहोत. त्यांच्याकडूनही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.” इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे संचालक स्टिव्ह एलवर्दी यांनी माहिती दिली.

असं असेल इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचं वेळापत्रक –

  • ८ ते १२ जुलै – पहिली कसोटी (Ageas Bowl)
  • १६ ते २० जुलै – दुसरी कसोटी (Old Trafford)
  • २४ ते २८ जुलै – तिसरी कसोटी (Old Trafford)