‘‘परदेशातील सामन्यात आपल्याला अल्पावधीत खेळायला मिळेल अशी मी कधी अपेक्षा केली नव्हती. मात्र म्यानमारमधील आशियाई आंतरक्लब फुटबॉल सामन्यात मला संधी मिळाली. त्या अनुभवाचा फायदा मला भावी कारकीर्दीसाठी उपयुक्त ठरणार आहे,’’ असे पुणे क्लबचा खेळाडू प्रकाश थोरातने सांगितले.
म्यानमारमधील नेई पेईतॉ संघाबरोबर पुणे क्लबचा सामना नुकताच आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात पुणे क्लबने ३-३ अशी बरोबरी केली. या लढतीत पुणे क्लबचे प्रतिनिधित्व करण्याची संधी थोरातला मिळाली. म्यानमारमधील अनुभवाविषयी थोरात म्हणाला, ‘‘परदेशातील मैदानावर हा माझा पहिलाच सामना होता. त्यामुळे या सामन्यात खेळण्यासाठी मी खूप उत्सुक झालो होतो. परदेशी प्रेक्षकांसमोर खेळताना मला खूप आनंद मिळाला. आशिया क्लब स्पर्धेत भाग घेण्याचे स्वप्न साकार झाल्यामुळे मी खूप समाधानी होतो.’’
‘‘म्यानमारमधील सामन्यासाठी संघाचा सराव सुरू असताना अचानक स्नोई यांनी मला म्यानमारला जायचे आहे हे सांगितल्यावर माझा विश्वासच बसला नाही. त्या वेळी मला खूप आनंद झाला, मात्र मोठय़ा सामन्यात खेळण्याचे दडपणही माझ्यावर आले. तथापि, स्नोई यांनी मला खूप मौलिक सूचना केल्या. त्यांच्या सूचनांमुळे माझा आत्मविश्वास उंचावला. परदेशातील खेळाडूंचा दर्जा खूपच वरचा दर्जाचा आहे. त्यांच्याबरोबर झुंज देताना मला खेळातील अनेक बारकावे शिकावयास मिळाले. मला भावी कारकीर्दीसाठी ती शिकवणींची शिदोरीच आहे,’’ असे थोरातने सांगितले.