ओरिसाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर स्वयम्स मिश्राने एनएससीआयतर्फे आयोजित केलेल्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सनसनाटी विजय मिळवला. मिश्राने युक्रेनच्या ग्रँडमास्टर तिमोशेन्को जॉर्जियीला नमवले. मिश्राने जॉर्जियाविरुद्ध निम्झो इंडियन बचावात्मक पद्धतीने सुरुवात केली. आक्रमक सुरुवात करणाऱ्या मिश्राने नवव्या चालीत जॉर्जियीवर हल्लाबोल केला. बाकी प्याद्यांना वाटचाल करण्यासाठी राजाला अग्रभागी ठेवून मिश्राने डावपेच रचले. या डावपेचांमुळे जॉर्जियेने ३०व्या चालीत पराभव स्वीकारला.
पुण्याच्या ग्रँडमास्टर अक्षयराज कोरेने आंतरराष्ट्रीय मास्टर रवीचंद्रन सिद्धार्थवर मात केली. तो ७.५ गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या सिद्धार्थने १५व्या चालीत चूक केली. या चुकीचा फटका त्याला बसला आणि २९व्या चालीत त्याने सामना गमावला.
दरम्यान, जॉर्जिआचा ग्रँडमास्टर पँटासुलिआ लेव्हान, ताजिकिस्तानचा ग्रँडमास्टर अमोनताव्ह फारुख आणि ग्रँडमास्टर एम. मेखाइल आठ गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. या स्पर्धेच्या गुरुवारी होणाऱ्या अखेरच्या फेरीत विजय मिळवणाऱ्या चार भारतीय खेळाडूंना ग्रँडमास्टर किताब मिळवण्याची संधी आहे.