भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यक्तींना भारतीय ऑलिम्पिक असोसिएशच्या (आयओए) निवडणुकीपासून दूर ठेवावे, या मुद्दय़ावर  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) ठाम राहण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी आयओसीचे अध्यक्ष जॅक रॉगे यांना पत्र पाठवले आहे.
आरोपपत्र दाखल झालेल्या व्यक्तींना निवडणूकीत थारा देऊ नये, या आयओसीच्या शिफारशीवर आयओएने रविवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत नवा तोडगा शोधून काढला. आरोपपत्र दाखल झालेल्यांना संसदेची निवडणूक लढवता येते, असा युक्तीवाद करत आयओएने दोन वर्षांपेक्षा जास्त वेळ शिक्षा झालेल्यांना आयओएची निवडणूक लढवता येणार नाही, असा तोडगा काढला होता.
क्रीडामंत्री जितेंद्र सिंग आयओएच्या नव्या तोडग्याशी सहमत नाहीत. ‘‘आयओएच्या बैठकीतील निकालामुळे मी नाराज झालो आहे. त्यामुळे वादग्रस्त अधिकाऱ्यांनाही निवडणूक लढवता येऊ शकते. आयओसीने आयओएसमोर ठेवलेल्या शिफारशी फोल ठरल्या, असे वाटत आहे. केंद्र सरकार आयओसीने ठेवलेल्या शिफारशींशी सहमत आहे,’’ असे जितेंद्र सिंग यांनी पत्रात म्हटले आहे.